
सामान्य ‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नव्याकोऱया 150 इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. पुढील आठवडाभरात शहर व उपनगरांतील विविध मार्गांवर नव्या बसेस प्रवासी सेवेत धावणार असल्याने मुंबईकरांचा रस्ते प्रवास ‘कूल कूल’ होणार आहे. वाढत्या उकाडय़ात एसी बसेसचा मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बेस्टच्या ताफ्यात सध्या 1745 इलेक्ट्रिक एसी बसेस आहेत. या बसेस शहर व उपनगरांतील 237 मार्गांवर धावत आहेत. त्यात 150 नव्या एसी बसेसची भर पडणार असल्याने एकूण एसी बसेसची संख्या 1895 होणार आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर मार्गांवर एसी गाडय़ांच्या फेऱया सुरू करता येणार आहेत. पश्चिम उपनगरातील ओशिवरा (जोगेश्वरी) आगारात 82, गोराई-बोरिवली आगारात 12, पूर्व उपनगरात कुर्ला आगारात 24 आणि आणिक आगारात 33 एसी बसेस दाखल झाल्या आहेत. 150 बसेसमध्ये इलेक्ट्रिक बस उत्पादक पंपनी ‘पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स’च्या 115 इलेक्ट्रीक बसेस आहेत, तर ओलेक्ट्रा पंपनीच्या 35 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. सध्या वेगवेगळ्या आगारांमध्ये नव्या गाडय़ा पार्क केल्या आहेत. या गाडय़ांच्या लोकार्पणाचा दिवस अद्याप निश्चित झालेला नाही. मात्र 1 नोव्हेंबरपूर्वी नव्या बसेस मुंबईकरांच्या सेवेत शहर आणि उपनगरांतील विविध मार्गांवर धावतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. अनेक साध्या बसेसचे एसी बसेसमध्ये रुपांतरण करणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
बस क्रमांक 1864 आज सेवानिवृत्त होणार
एसी बसेसची संख्या वाढत असतानाच बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसगाडय़ा कमी होत चालल्या आहेत. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण अभियाना अंतर्गत दाखल झालेली शेवटची बस क्रमांक 1864 येत्या शनिवारी सेवानिवृत्त होत आहे. या बसला समारंभपूर्वक निरोप दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच बस क्रमांक 1942 या बसला निरोप देण्यात आला होता. 15 वर्षांचे आयुर्मान पूर्ण झालेल्या बेस्ट उपक्रमातील बसगाडय़ा भंगारात काढल्या जात आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या गाडय़ांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.






























































