अंतराळाचे अंतरंग – मंगळावरील साध्या यीस्टचा अद्भुत प्रयोग

>> सुजाता बाबर

‘मंगळावर कधी जीवन होते का?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आज आपण नव्या उंबरठय़ावर उभे आहोत. अहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळेमध्ये पुरुषार्थ आय. राजगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वसाधारणपणे प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱया यीस्टवर मंगळासारख्या परिस्थितींची चाचणी घेतली आणि त्याचे उत्तर या प्रश्नाला दुजोरा देणारे मिळाले.

मंगळ ग्रह आणि त्यावरील जीवन, त्यावर वास्तव्याच्या शक्यता हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, ‘मंगळावर कधी जीवन होते का?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आज आपण नव्या उंबरठय़ावर उभे आहोत. जीवन केवळ अस्तित्वात राहू शकते इतकेच नव्हे तर कोणत्या परिस्थितीत टिकू शकते, या अनुषंगाने नुकतेच एक संशोधन झाले आहे.

अहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळेमध्ये झालेल्या या प्रयोगात पुरुषार्थ आय. राजगुरू आणि त्यांच्या सहकाऱयांनी सर्वसाधारणपणे प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणाऱया यीस्टवर मंगळासारख्या परिस्थितींची चाचणी घेतली. आश्चर्य म्हणजे हा साधा जीव, ज्याचा वापर दररोजच्या ब्रेड, बीअर आणि दारूमध्ये केला जातो तो मंगळावरच्या कठोर परिस्थितीत चक्क जगला!

मंगळ हा केवळ लालसर ग्रह नाही, तर अत्यंत प्रतिकूल पर्यावरणाचा दूत. त्याच्या पृष्ठभागावर तापमान उणे 60 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. हवेत ऑक्सिजन नगण्य असतो आणि मातीमध्ये परक्लोरेट्स नावाचे मोठय़ा प्रमाणात ऑक्सिडाईझ होणारे क्षार असते. त्यात भर म्हणजे अशनींच्या आघातामुळे मंगळावर मोठी विवरे निर्माण होतात तेव्हा निर्माण होणाऱया शॉक वेव्हज् म्हणजे जिवासाठी एक भयानक धक्का असतो. अशा परिस्थितीत कोणताही सजीव जगू शकेल का? याचे उत्तर शोधण्यासाठी भारतीय संशोधकांनी एका अनोख्या जिवाला प्रयोगासाठी निवडले तो म्हणजे यीस्ट, म्हणजेच सर्वसामान्य बेकिंग आणि ब्रूइंग यीस्ट.

या संशोधनात वैज्ञानिकांनी हाय-इंटेन्सिटी शॉक टय़ूब फॉर अॅस्ट्रोकेमिस्ट्री या अत्याधुनिक यंत्रात मंगळावर घडणाऱया धक्क्यांची कृत्रिम पुनर्रचना केली. यीस्टवर जवळपास 6860 किलोमीटर्स प्रती तास इतक्या वेगाच्या शॉक वेव्हज्चा मारा करण्यात आला. म्हणजे प्रचंड तीव्र! यानंतर यीस्टला मिलिमोलर सोडियम परक्लोरेटमध्ये रूपांतरित करण्यात आले जे मंगळाच्या मातीत असलेल्या प्रमाणाइतके आहे. हे दोन्ही ताण स्वतंत्रपणे व एकत्रितपणे देऊन यीस्टच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला.

यीस्ट या दोन्ही ताणांनंतरही मृत झाले नाही! त्यांच्या वाढीचा वेग थोडा कमी झाला, परंतु त्यांनी एक विशेष जैविक युक्ती वापरून स्वतचे रक्षण केले. यीस्टने आपल्या पेशींमध्ये रायबोन्युक्लिओप्रोटीन कंडेन्सेट्स नावाच्या सूक्ष्म संरचना तयार केल्या. या कंडेन्सेट्स रायबोन्युक्लिक आम्लाचे नुकसान होऊ न देता त्यांना सुरक्षित ठेवतात आणि पेशींचे दैनंदिन कार्य तात्पुरते मंदावून जिवाला एका ‘संरक्षण अवस्थेत’ म्हणजेच वाचवण्याच्या मोडमध्ये नेतात. मजेशीर गोष्ट अशी की, मानवासह अनेक जीवदेखील याच पध्दतीने स्वतचे संरक्षण करतात. यीस्टने अखेर मंगळावर जैविक बुद्धिमत्ताच दाखवली! रायबोन्युक्लिक आम्ले आणि त्याच्याशी संबंधित संरचना हे जीवन टिकवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहेत; मग ते पृथ्वीवरील असो वा परग्रहावरील. जर इतका साधा एकपेशीय जीव मंगळासारख्या कठीण वातावरणात आपले अस्तित्व टिकवू शकतो, तर मंगळाच्या पृष्ठभागाखाली किंवा त्याच्या बर्फाळ थरांमध्ये सूक्ष्मजीव स्वरूपातील जीवन कधीतरी अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जागतिक पातळीवरील संशोधक मंगळ, युरोपा आणि एन्सेलॅडस्सारख्या ग्रहांवर जीवनाच्या शक्यता शोधत आहेत आणि या भारतीय अभ्यासाने या मोहिमांना नवी दिशा दाखवली आहे. यीस्टवरील हा प्रयोग केवळ जैविक जिज्ञासा नाही, तर जीवनाच्या मूलभूत परिभाषेला आव्हान देणारा आहे. मंगळावर जर जीवन कधी अस्तित्वात असले तर ते कदाचित पृथ्वीवरील यीस्टप्रमाणेच ‘अनुकूलनशील’ होते.

कदाचित भविष्यात जेव्हा मानव मंगळावर पहिले अन्न तयार करेल, तेव्हा ते यीस्टच्या मदतीनेच शक्य होईल. आणि आपण मागे वळून पाहू तेव्हा म्हणू- ‘जीवन हे पृथ्वीपुरते मर्यादित नाही; ते विश्वभर विस्तारण्यास तयार आहे.’
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)
[email protected]