प्रणाम वीरा – बांगला मुक्ती युद्धातील खंदा शिलेदार

>> रामदास कामत

वडिलांची इच्छा शिरसावंद्य मानून देशसेवेत रुजू झालेले लेफ्टनंट मकरंद घाणेकर. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात आपले कर्तव्य बजावत असताना वयाच्या 22 व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. या शूरवीराची ही कहाणी.
सहसा मुलाने सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली तर आई-वडील सहजपणे तयार होण्याची शक्यता जरा कमीच असते, पण इथे तर वडिलांचीच इच्छा होती की, मुलाने जवानाची वर्दी अंगावर घालून देशसेवा करावी. वडिलांची इच्छा शिरसावंद्य मानून तो देशसेवेत रुजू झाला. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात आपले कर्तव्य बजावत असताना वयाच्या 22 व्या वर्षी त्याला वीरमरण आले. आपल्या वडिलांची छाती अभिमानाने भरून यावी अशी मोलाची कामगिरी करणाऱ्या त्या वीर योद्धय़ाचे नाव आहे सेकंड लेफ्टनंट मकरंद घाणेकर.

मकरंद रघुनाथ घाणेकर यांचा जन्म 19 जुलै 1949 रोजी विलेपार्ले येथे झाला. कुटुंबातील सर्वात धाकटे म्हणून सगळ्यांचे लाडके होते. अभ्यास आणि खेळात अतिशय हुषार. उर्दू आणि अरबी भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवले होतेच, पण पुढे जाऊन गोरीला युद्धप्रकाराचेही प्रशिक्षण घेतले. वडिलांच्या इच्छेनुसार आणि स्वतच्या आवडीने मकरंद यांनी बारावी परीक्षा दिल्यानंतर लगेचच डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपल्या सैनिकी कारकीर्दीला शुभारंभ केला. प्रशिक्षणानंतर त्यांची मराठा लाइट इन्फेन्ट्री रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली.

भारत आणि पाकिस्तानमधील 1971 चा बांगला युद्धाचा काळ होता. हे युद्ध अधिकृतपणे 03 डिसेंबर 1971 रोजी सुरू झाले असले तरी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या आंदोलकांवर केलेल्या अत्याचारांमुळे सीमेपलीकडून निर्वासित येऊ लागले. सीमेवर चकमकी सुरू झाल्या होत्या. तेथे आक्रमक गस्त घालताना सेकंड लेफ्टनंट मकरंद घाणेकर यांची युनिट, 5 मराठा, जेसोरपासून सुमारे 30 किमी अंतरावर कोटचंदपूर येथे तैनात होती.

भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तान (हल्लीचा बांगलादेश) मधील कोटचंदपूर प्रदेश शर्थीने जिंकला होता. रात्रीच्या अंधारात मकरंद यांची तुकडी कोटचंदपूरहून जेशोर शहराकडे मार्गक्रमण करीत होती. चित्रा नदी आणि कोपोथाखो नदी यामध्ये कोटचंदपूर आहे. चित्रा नदीवरील पूल पाकिस्तानी सैन्याने उडवून दिला होता. त्याच भागातून मकरंद यांची तुकडी पुढे जात होती. मकरंद यांनी एक हातबॉम्ब फेकून पाकिस्तानी सैन्याचा अंदाज घेतला, परंतु समोरून काहीच प्रतिसाद न आल्यामुळे मकरंद यांची तुकडी पुढे सरकली. अचानक पाकिस्तानी सैन्याचा हल्ला सुरू झाला.

5 डिसेंबर 1971 ला कोछंडपूर कालीगंज आघाडीतून 30 जवानांचे नेतृत्व करत ते शत्रूच्या चौक्यांमध्ये पार आत घुसले. या आधुनिक बाजी प्रभूने ‘हर हर महादेव’चा नारा देत गनिमाला टिपत टिपत पार मुसंडी मारली. विद्युतगतीने त्यांची पलटन पूर्व पाकिस्तानमध्ये चार किलोमीटरपर्यंत आत घुसली. पाकिस्तानी सैन्य शेकडय़ांनी चाल करून आले. निधडय़ा छातीचे मकरंद घाणेकर त्वेषाने लढत होते. अंधाराचा फायदा घेत पाच पाकिस्तानी सैनिक मकरंदवर तुटून पडले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी चौघांना बंदुकीच्या दस्त्याने धाराशाही केले. तलावाच्या बाजूने भारतीय तुकडी पुढे जात असतानाच एका पाकिस्तानी सैनिकाने मकरंद यांच्या डोक्यावर बंदुकीचा दस्ता जोरात मारला आणि त्या जीवघेण्या आघाताने मकरंद तलावात कोसळले. त्याचक्षणी वेगात आलेल्या गोळीने त्यांचा वेध घेतला आणि ते कोसळले, पण त्याही परिस्थितीत स्वतःला सावरत त्यांनी त्या पाक सैनिकाचा खातमा केला. तोपर्यंत मकरंद यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भारतीय सैनिकांनी शेकडो शत्रू सैनिक ठार केले होते. नंतर भारतीय सैन्याची कुमकसुद्धा आली. जेशोर शहरही ताब्यात आले, परंतु मकरंद घाणेकर हे भारतीय सैन्याचे उमदे अधिकारी देशाने गमावले. फक्त 22 वर्षे वयाचे भारतीय लष्करी अधिकारी मकरंद घाणेकर आपल्या मायभूमीसाठी कामी आले. “तू एका सैनिकाची माता आहेस तेव्हा तू माझी काळजी करू नकोस.’’ समरांगणावर उतरण्यापूर्वी आपल्या वीर मातेला लिहिलेल्या शेवटच्या पत्रातील त्याचं हे सांत्वन.

वीर मकरंद रघुनाथ घाणेकर यांनी भारत-पाक युद्धात ज्या असामान्य शौर्याची प्रचीती दिली, त्या शौर्याबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र बहाल केले. मुंबई महापालिकेने हुतात्मा मकरंद घाणेकर यांच्या पराक्रमाची दखल घेऊन ज्या पार्ले येथे त्यांचा जन्म झाला तेथील एका महत्त्वाच्या मार्गाला वीर मकरंद घाणेकर मार्ग असे नाव देऊन त्यांच्या वीरश्रीचा सन्मान केला आहे.

[email protected]