
या वर्षाच्या सुरुवातीला ‘Tea’ आणि ‘TeaOnHer’ हे दोन अॅप लॉंच झाले होते. अॅपल स्टोअरचे हे अॅप्स रातोरात व्हायरल झाले होते. कारण यांमध्ये एक विशेष फीचर होते. या दोन डेटिंग अॅप्सना अॅपलने मोठा झटका दिला आहे. युजर प्रायव्हसीचे उल्लंघन आणि गंभीर तक्रारींमुळे अॅपलने या दोन्ही अॅप्सना आपल्या जागतिक अॅप स्टोअरमधून अधिकृतपणे हटवले आहे. खास महिलांसाठी तयार केलेले हे अॅप्स आता आयफोन वापरकर्त्यांना एक्सेस करता येणार नाहीत. युजर्स ज्याला डेट करत आहेत, त्याबद्दलचा फीडबॅक अॅपवर पोस्ट करू शकत होते. या फीडबॅकला ‘रेड फ्लॅग’ आणि ‘ग्रीन फ्लॅग’ अशा स्वरूपात दाखवले जात होते. मात्र अनेक युजर्सनी या अॅप्सबद्दल गंभीर तक्रारी केल्या, ज्यात प्रायव्हसी नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते. अॅपलने या तक्रारींची दखल घेऊन कठोर पाऊल उचलले आहे.
दिल्लीचे नागरिक घसादुखी, डोळ्यांच्या जळजळीने त्रस्त
दिवाळीच्या रात्रीपासून दिल्ली-एनसीआरमधील हवा विषारी झाली आहे. बहुतेक भागांत हवेचा दर्जा निर्देशांक (एक्यूआय) 1000 पेक्षा जास्त होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना न जुमानता लोकांनी मोठय़ा प्रमाणात फटाके जाळले. त्यामुळे 25 ऑक्टोबर रोजी सकाळी अनेक भागांत एक्यूआय 400 पेक्षा जास्त झाला. पंजाब आणि हरयाणामध्ये या वर्षी पऱहाटी जाळण्याच्या घटनांमध्ये 77.5 टक्के घट झाली असली तरी दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झालेली नाही. दिल्लीत ही पातळी मानकापेक्षा जवळ जवळ 24 पट जास्त होती. सर्व्हेनुसार, दिल्ली-एनसीआरमधील 25 टक्के कुटुंबांमध्ये डोळय़ांची जळजळ, डोकेदुखी किंवा निद्रानाशाचा त्रास आहे. प्रत्येक चार कुटुंबांपैकी तीन कुटुंबांमध्ये कोणीतरी वैद्यकीय आजाराने ग्रस्त आहे. 42 टक्के घरांमध्ये कोणीतरी घसा खवखवणे किंवा खोकल्याची तक्रार करतो.
दिल्ली-एनसीआरमधील 44 हजारांहून अधिक लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला.
व्हूज वाढवण्यासाठी बनवला सौदीमध्ये अडकल्याचा व्हिडीओ
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एक तरुण सौदी अरेबियात अडकल्याचा दावा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तो तरुण पुन्हा हिंदुस्थानात परतण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे दिसून आले. मात्र या प्रकरणात आता सौदी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सौदी अरेबियात अडकल्याचा दावा करत आणि मदतीची याचना करत व्हायरल झालेल्या तरुणाचा व्हिडीओ हा केवळ सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला असल्याचे सौदी पोलिसांच्या अधिकाऱयांनी सांगितले. त्या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सोशल मीडिया अकाऊंटला ह्यूज वाढवण्यासाठी खोटा व्हिडीओ बनवल्याचे आढळून आलेय.
लखनौमध्ये एसी बसला भीषण आग
लखनौ येथे आग्रा एक्स्प्रेस वेवर धावणाऱया एसी बसचा टायर अचानक फुटला आणि बसला भीषण आग लागली. काही क्षणांतच बसने पूर्ण पेट घेतला. सुदैवाने बसमधील सर्व 70 प्रवासी बचावले. आग एवढी भयंकर होती की, धुराचे लोट दोन किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होते. आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाबाहेर गेली. तासाभराने घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी पोहोचली. मात्र तोपर्यंत बसचा कोळसा झाला होता. ही दुर्घटना रविवारी पहाटे 4 वाजता काकोरी ठाण्याच्या हद्दीत एक्स्प्रेस वेवर टोल नाक्याजवळ घडली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ताशी 80-90 किलोमीटर वेगाने धावत होती.

























































