
गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिह्यात धुमाकूळ घालणारा ओमकार हत्ती तेरेखोल नदी ओलांडून वाफोली गावात दाखल झाला आहे. वन विभागाला ओमकारला पकडण्यात अपयश आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी इन्सुली येथे दाखल झाल्यानंतर ओमकारने आज सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोखून धरला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
शनिवारी सायंकाळी इन्सुलीत आलेल्या ओमकारने रात्रभर दोन्ही महामार्गांच्या मधील भागात ठाण मांडले होते. महामार्ग ओलांडताना ओमकारला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. आज पहाटे सहा वाजल्यापासून तो महामार्ग ओलांडून तेरेखोल नदीपात्राच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नात होता. रस्त्यावर वाहनांची वाढलेली वर्दळ आणि हत्तीला पाहण्यासाठी जमलेल्या बघ्यांच्या गर्दीमुळे परिस्थिती हाताळताना वन विभागाची मोठी दमछाक झाली.
वाहतूक ठप्प
हत्ती महामार्ग ओलांडून जात असताना दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती, ज्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वन विभागाचे पथक सध्या हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
























































