
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला सैनिकी विद्यालयाच्या संघाने 14 वर्ष वयोगटाखालील आंतरशालेय हॉकी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत नंदुरबार संघावर 1-0 ने मात करत विजय नोंदवला आहे. या कामगिरीच्या आधारे संघाची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भोसलाच्या खेळाडूंनी संघभावना, शिस्त आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. या सामन्यात भोंसला संघाने 1-0 असा निर्णायक विजय नोंदवत विजेतेपद पटकावले. विजयी संघात अमृत काटकार, दक्ष जोशी, व्हिक्टर मलेला, आकाश शिरसाठ, रेयांश तुनतुने, कविश मांडवकर, आयुष सातपुते, कृषांग माळी, अर्णव माईन, प्रसाद पाटील, अनुज पाटील, मनीष पवार यांचा समावेश होता. सामन्यातील सहभागी विद्यार्थ्यांनी शालेय सहलीला न जाता, तसेच या विद्यार्थ्यांच्या निर्णयामध्ये पालकांचादेखील सकारात्मक प्रतिसाद पाहून विद्यार्थ्यांनी शाळेत राहून कठोर परिश्रम करून यशाला गवसणी घातली. संघाच्या यशात शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देशपांडे, समादेशक कर्नल संदीप पुरी, प्राचार्य मेजर विक्रांत कावळे तसेच क्रीडा शिक्षक वैभव खवले, आशीष देवकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
























































