शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहता का? बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांवर आसुड

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अभ्यास सुरू आहे असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज आसुड ओढला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुहूर्त काढायला बामणाची वाट पाहत आहात का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. बामण मिळत नसेल तर यूपीमधून आणून देतो, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करा, अशी मागणीही त्यांनी केली.

सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील घेरडी येथे शेतकऱ्यांचा ‘आसुड मेळावा’ घेण्यात आला होता. त्यात बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, अभ्यास सुरू आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चार-चार पुस्तकेच पाठवून देऊ. आजवर इतका लबाड मुख्यमंत्री देशाने पाहिला नाही, एवढे लबाड देवाभाऊ बोलतात. सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवल्याचे सांगतात. आता मोदींना कधी जाग यायची आणि कधी सोयाबीन खरेदी व्हायची, असे बच्चू कडू म्हणाले.

शेतकऱ्याच्या कापसाला किंमत नाही, पण कापसापासून बनणाऱ्या झेंड्याच्या रंगाला किंमत आहे, अशी खंतही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली. एक लाख कोटी बजेट असणाऱ्या मुंबईला राज्य सरकारच्या बजेटमधून 65 हजार कोटी रुपये देतात, मात्र उर्वरित राज्याला त्यापेक्षा कमी मिळते. हे अर्थकारण का? असा सवालही त्यांनी केला.

56 इंच छातीवाले मोदी ट्रम्पला घाबरतात

बच्चू कडू यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. 56 इंच वाले मोदी ट्रम्पला घाबरतात आणि तिथे त्याच्यापुढे नमाज पडतात, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी जात-धर्म-पक्ष सोडून एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे आवाहनही केले.