इस्रो सर्वात ताकदवान उपग्रह अंतराळात सोडणार, 2 नोव्हेंबरला प्रक्षेपित करणार; खास नौदलासाठी केले डिझाईन, सागरी सुरक्षेत मोठी झेप

हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येत्या 2 नोव्हेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नौदलासाठी विकसित केलेला सीएमएस-03 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा लष्करी दळणवळण उपग्रह नौदलाची नेटवर्प-पेंद्रित युद्ध क्षमता आणि देखरेखीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवेल. सीएमएस-03 हा हिंदुस्थानचा आतापर्यंत सर्वात ताकदवान असा कम्युनिकेशन सॅटेलाईट असेल, जो सागरी क्षेत्राच्या सुरक्षेला मोठय़ा उंचीवर घेऊन जाईल, असे म्हटले जातेय.

इस्रोने निवेदनात म्हटलेय की, हिंदुस्थानचे एलव्हीएम 3 प्रक्षेपण यान येत्या 2 नोव्हेंबर रोजी आपल्या पाचव्या उड्डाणात सीएमएस-03  कम्युनिकेशन सॅटेलाईटला कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी उड्डाण घेईल.

सीएमएस-03 हा एक मल्टी बँड कम्युनिकेशन उपग्रह आहे, ज्याला जमीन आणि विस्तृत सागरी क्षेत्रांमध्ये सेवा देण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. सुमारे 4400 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह हिंदुस्थानचा सर्वात वजनदार कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे.

सीएमएस-03 चे कार्य आणि महत्त्व

हिंद महासागर क्षेत्रात चीनकडून निर्माण होत असलेल्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर लष्करी समन्वय, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि धोक्याला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रगत दळणवळण खूप महत्त्वाचे ठरते. सीएमएस-03 अनेक फ्रिक्वेन्सी बँड वापरतो, ज्यामुळे तो एकाच वेळी आवाज, व्हिडीओ आणि डेटा प्रसारित करू शकतो. यामुळे भारताच्या किनारपट्टीपासून 2000 किमी पर्यंत पसरलेल्या हिंद महासागर प्रदेशातील नौदल जहाजे, पाणबुडय़ा, विमाने आणि किनारी कमांड सेंटर्स यांच्यात अखंड संवाद साधता येईल.

सीएमएस-03  मध्ये ‘बियॉन्ड लाईन ऑफ साईट’ क्षमता आहे, याचा अर्थ पृथ्वीच्या वक्रतेमुळे किंवा इतर भौगोलिक अडथळ्यांमुळे दळणवळणात कोणताही अडथळा येणार नाही. या क्षमतेमुळे नौदलाची जहाजे आणि पाणबुडय़ा महासागराच्या दुर्गम भागांमध्येही संपर्प कायम राखू शकतील. या उपग्रहाची एकाच वेळी 50 हून अधिक नौदल प्लॅटफॉर्म्सना जोडण्याची क्षमता आहे.

 हा उपग्रह संपूर्ण हिंद महासागर प्रदेशात, ज्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे तसेच लक्षद्वीप बेटांचा समावेश आहे, सतत उच्च-बँडविड्थ दळणवळण कव्हरेज प्रदान करेल. याव्यतिरिक्त अधिक शक्तिशाली ऑम्प्लिफायर आणि संवेदनशील रिसीव्हर्समुळे सुसज्ज असलेला हा उपग्रह कठीण परिस्थितीतही विश्वसनीय संवाद कायम राखेल. हा उपग्रह पाळत ठेवणे, गुप्तचर माहिती, नेव्हिगेशन आणि हवामान निरीक्षण यासाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे.