
वैश्विक
सध्या तळपत्या उन्हाचे चटके बसत असले तरी 4 अब्ज 568 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला ‘हिरण्यगर्भ’ किंवा सूर्य हाच आपला जीवनदाता आणि त्राता आहे हे लक्षात ठेवायला हवं. ‘ऑक्टोबर हीट’ने काहिली करणारा सूर्य हे आपलं त्याबाबतचं निरीक्षण. एरवी, स्वतः सूर्याला त्याची ‘जाणीव’ असण्याचं कारणच नाही. कारण, एकूणच विराट निसर्ग निर्हेतुक असतो. त्याला आपण आपल्या पद्धतीने पाहतो. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ ही कविता होईपर्यंत, पाऊस ‘नियमित’ येत होता तो आपल्या पॅलेंडरनुसार. आता पृथ्वीवरच्या वातावरणात काही नैसर्गिक तर अनेक कृत्रिम कारणांनी पावसाचा ‘नेम’ चुकत चाललाय. तो इतका की, ‘पाऊस कधी येईल नि जाईल याचा काही नेम (म्हणजे नियम) नाही,’ असं म्हणायची वेळ आली आहे.
त्याचप्रमाणे दरवर्षी उन्हाळा ‘जास्तच’ होतोय म्हणत जग गेली पंचवीस-तीस वर्षे सुस्कारे टाकतंय. कधी नव्हे त्या इंग्लंडपासून कॅनडापर्यंत ‘हीट वेव्हज्’ जाणवतायत. उन्हाच्या वाढत्या झळा आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची गरमागरम चर्चा तेवढीच रंगतेय.
पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला सूर्य मात्र ‘मुद्दाम’ काहीच करत नाही. अंतर्यामी किंवा गाभ्यातील हायड्रोजनचं हिलियम वायूत रूपांतर करणारी प्रचंड क्षमतेची नैसर्गिक ‘अणुभट्टी’ बाळगून असलेला सूर्य त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांमुळे चर्चेत येतो. सौरवारे, सौरज्वाला, सौर-प्रारणे आणि त्यांची नैसर्गिकरीत्या कमी-अधिक प्रभावाची चव्रे. हा अभ्यासकांसाठी चिंतनाचा आणि सर्वसामान्यांसाठी माणसासह सर्व सजीवांसाठी अनेकदा चिंतेचा विषय ठरतो.
या वेळी एक गोष्ट आपल्या क्वचितच लक्षात येते ती म्हणजे, कधी कधी ‘तापदायक’ वाटणाऱ्या सूर्यापासून आपण पृथ्वीवासीय अत्यंत योग्य अंतरावर आहोत, म्हणूनच ‘आहोत.’ आपल्या अस्तित्वाचं आणि तत्पूर्वी निर्मितीचंही गणित ज्या योगायोगातून ठरलं आहे ते सौर-संकुलातलं आपलं ‘वसाहतयोग्य’ (हॅबिटेबल) स्थान.
मग प्रश्न येतो की, सूर्यापासून इतर सर्व ग्रहांची नेमकी अंतरं आणि तिथे सूर्यकिरणांचा ‘प्रभाव’ आपल्या पृथ्वीपेक्षा किती निराळा असेल? पुन्हा सोप्याच शब्दात जाणून घेऊ या. सूर्याभोवती फिरणाऱ्या आठ मान्यताप्राप्त ग्रहांसह बनलेल्या सौर संकुलात इतरही अनेक घटक आहेत. त्यांची अतितप्त वायगोळापासूनची (लोहगोल नव्हे) अंतरे किती? आणि कोणतीही आदळआपट न होता हे सर्व ग्रह या तेजोनिधीभोवती सुखेनैव कसे फिरतायत?
या सर्व ग्रहांमधल्या आणि लघुग्रह, उपग्रह, अशनी, अशनी पट्टे वगैरेंसह साकारलेल्या सौर संकुलातील जागा आंतरग्रहीय माध्यमाने म्हणजे सुक्ष्मकण आणि धुळीने भरलेली आहे. आता क्रमाक्रमाने सूर्य ते ग्रह ही अंतरं जाणून घेऊ.
बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा म्हणजे त्यापासून 5 कोटी 90 लाख किलोमीटरवरचा ‘दगडी’ग्रह. त्यानंतरच्या ‘उलट’ गतीने स्वतःभोवती फिरणाऱ्या शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर 10 कोटी 82 लाख किलोमीटर. त्याचा दिवस त्याच्या वर्षापेक्षा मोठा असतो हे त्याचं आणखी एक विस्मयकारी वैशिष्टय़. पृथ्वी हा सूर्यापासून 14 कोटी 96 लाख किलोमीटर अंतरावर असलेला आणि आतापर्यंत आपल्याला ज्ञात असलेला विश्वातला एकमेव ‘सजीव’ आणि ‘नील’ग्रह. पृथ्वीसारखं वातावरण, जीवसृष्टी अन्यत्र कोठे आहे का, याचा निश्चित पत्ता लागलेला नाही. मंगळावर किंवा गुरूच्या उपग्रहांवर अथवा अन्य कोण्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एखाद्या ग्रहावर ‘पाणी’ सापडल्याच्या बातम्या येतच असतात. त्यातील काही ठिकाणी पाणी आणि बर्फ आहे हे खरंच, परंतु किमान प्रगत सजीव असल्याचंही निष्पन्न झालेलं नाही मग अतिविकसित जीवसृष्टीची गोष्ट दूर राहिली.
बहुचर्चित मंगळ सूर्यापासून 22 कोटी 79 लाख किलोमीटरवर असून या ‘लाल’ ग्रहाभोवती अनेक कथा आणि कविकल्पनांची गुंफण झाली आहे. मंगळापलीकडचा गुरू सूर्यापासून 77 कोटी 83 लाख किलोमीटर अंतरावर असून त्याच्या सुमारे 99 उपग्रहांपैकी मोठय़ा उपग्रहांवर पाणी आणि सूक्ष्म सजीव असल्याचं म्हटलं जातं. ज्याच्या भोवतीची कडी किंवा वलयांची चर्चा 1609 पासून होतेय तो मोहक शनी ग्रह सूर्यापासून 1 अब्ज 427 कोटी किलोमीटर दूर आहे. त्याचा उपग्रह ‘टायटन’विषयी आपण वाचलंय. शनीपलीकडचा युरेनस 2 अब्ज 871 कोटी किलोमीटरवर असून त्याच्या नव्वद अंशाच्या कलत्या अक्षामुळे तो सूर्याभोवती ‘गडगडत’ असल्यागत फिरतो! आणि अखेरचा नेपच्युन हा ग्रह सूर्यापासून 4 अब्ज आणि 497 कोटी किलोमीटर अंतरावरून फिरत असून त्याचा उपग्रह ‘ट्रायटन’ स्वतःभोवती उलटगतीने (रिट्रोगेड) कसा फिरतो तेही आपण एका लेखात जाणून घेतलंय. प्लुटोचं ‘ग्रहपद’ 2004 मध्ये गेल्याने तो लघुग्रह ठरला आहे… या ग्रहमालिकेपलीकडेही सूर्याचा संकुल आहेच, पण पुढच्या लेखात अपसूर्य आणि उपसूर्य म्हणजे काय ते पाहू.


























































