भरकटलेल्या सात बोटीपैकी एकही बंदरात परतली नाही, मच्छीमारांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या आणि वादळात भरकटलेल्या सातही मच्छीमार बोटी आज रात्री उशिरापर्यंत कोणत्याही बंदरात परतल्या नाहीत. त्यामुळे या बोटींवर असलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. बोटींवरील वायरलेस यंत्रणा फेल झाल्याने या बोटींचे लोकेशन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत.

कौसा-ठाणे येथील अब्दुल्ला खान यांच्या मालकीची श्री साई समर्थ कृपा बोटीवरील खलाशांशी संपर्क झालेला नाही. मात्र मालकाशी संपर्क झाला. आज संपर्क झाला असून या बोटीवर १८ खलाशी आहेत, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी सांगितले. न्हावा-पनवेल येथील चंद्राई व श्री गावदेवी मरीन या दोन्ही बोटी पालघर किनाऱ्यापासून १२४ किमी सागरी अंतरावर बुधवारी दिसून आल्या होत्या. मात्र परतीच्या मार्गावर असलेल्या या दोन्ही बोटींच्या हालचाली गुरुवारी दिवसभरात दिसून आलेल्या नाहीत. मत्स्यव्यवसाय विभाग व अन्य त्रयस्थांकडूनच दोन्ही बोटी खलाशांसह सुरक्षित असल्याचे श्री गावदेवी मरीन मच्छीमार बोटीचे मालक सत्यवान पाटील यांनी सांगितले.

शोधमोहीम सुरू

मोंथा वादळामुळे मुंबई बंदरातील भरकटलेल्या या सातही मच्छीमार बोटी गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही बंदरात परतल्या नाहीत. त्यामुळे खराब हवामान व वादळी वाऱ्यामुळे भरकटलेल्या सातही मच्छीमार बोटी समुद्रातच सुरक्षित ठिकाणी नांगरून ठेवण्यात आल्या असल्याची शक्यता मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केली आहे. या बोटींची शोधमोहीम सुरू आहे, असे तटरक्षक दलाचे कमांडंट रवी वेणूगोपाल यांनी स्पष्ट केले आहे.