
फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यामुळे चर्चेत आलेल्या माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आज फलटण तालुक्यातील अन्यायग्रस्त जयश्री आगवणे यांनी लक्ष्य केले. झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास त्यांनी सुरुवात केली असल्याचा आरोप जयश्री आगवणे यांनी केला आहे.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण हायव्होल्टेज झाले असून, यावरून चहूबाजूंनी रान पेटले आहे. या प्रकरणात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आरोप झाल्यामुळे वातावरण आणखी तापले आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू होण्यापूर्वीच खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी निंबाळकर यांना ‘क्लीन चिट’ दिल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, राजकीय सत्तेचा वापर करून आपल्या कुटुंबावर खासदारांकडून झालेल्या अन्यायाचा पाढा फलटण विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढवलेल्या दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत वाचल्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे.
याचाच एक भाग म्हणजे, पैठणमधील माजी नगरसेवक अनुप शहा यांनी जयश्री आगवणे या दिगंबर आगवणे यांच्या पत्नीच नसल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या आरोपांना जयश्री आगवणे यांनी उत्तर दिले आहे. पंधरा वर्षांपूर्वी दिगंबर आगवणे यांच्याबरोबर रीतसर लग्न करून मी नांदत आहे. रणजितसिंह निंबाळकरांवर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे आता पर्याय नसल्याने त्यांनी एका स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप आगवणे यांनी केला आहे.
ज्यावेळेस मुलींनी विष पिले त्यावेळेस रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. आज पत्रकार परिषदेत नणंद सुनीता आगवणे यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. सासऱयांचा मृत्यू झाला या घटनेला खूप वर्षे झाली आहेत. त्याबाबत आजपर्यंत हे का गप्प बसले होते, असा सवाल जयश्री आगवणे यांनी उपस्थित केला आहे.
दम असेल तर समोर येऊन आरोप करा
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये जर दम असेल तर त्यांनी समोर येऊन आरोप करावेत, आपल्या चेल्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता? असा सवाल करत, ज्यावेळी तुमची पत्नी निवडणुकीला उभी होती, ज्यावेळेस तुम्ही लोकसभेची निवडणूक लढलात, त्यावेळेस तुम्हाला दिगंबर आगवणे चालले, जयश्री आगवणे चालल्या. मात्र, आज तुमच्या कटकारस्थानांना समोर आणताच तुम्ही आमच्यावर शिंतोडे उडवता काय? असा सवाल आता जयश्री आगवणे यांनी केला आहे.
 
             
		





































 
     
    






















