मोहोळ अण्णा, खेळात खेळाडूपणा ठेवा; राजकारण नको! अजित पवार गटाची मोहोळांवर टीका

लोकशाहीत प्रत्येकालाच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण, हा अधिकार मिळाल्यावर विसर पडू नये की यशाच्या पायावर कोणाची साथ होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनबाबत केलेले वक्तव्य पाहता, राजकारणात कृतज्ञतेचा दर्जा आता संपला का? असा सवाल करत मोहोळ यांनी राजकारण खेळात न आणता खेळाडूपणा टिकवावा, असा टोला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी मोहोळ यांना लगावला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांना आमचा विरोध नाही. मात्र, संघटनेच्या कार्यशैलीला आमचा विरोध असल्याचे वक्तव्य मोहोळ यांनी आज केले. या वक्तव्यााच खरपुस समाचार अजित पवार गटाने घेतला.

खासदारकीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ यांना दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून देताना कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाल, मोहोळ यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा असा त्या वेळी अजित पवार यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आदेश दिला होता. आम्ही दिवस-रात्र झटून त्यांना खासदार केले. पण आज तेच मोहोळ अजित पवारांवर टीका करत आहेत, हे अत्यंत खेदजनक आहे. एकीकडे अजित पवार यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे पवार ज्या संस्थेवर काम करतात, त्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, ही ढोंगी भूमिका आहे. पहाटेच्या वेळी अधिकारी पाठवून पवारांच्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई करायला लावणे, हा खेळाडूवृत्तीला शोभणारा प्रकार नाही. स्वतःला खेळाडू म्हणवणार्‍या माणसाने जर खेळातच राजकारण आणलं, तर त्यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं नाही. मोहोळ यांनी राजकारण खेळात न आणता खेळाडूपणा टिकवावा, असा टोलाही देशमुख यांनी लगावला.

एक कोटींच्या सरकारी निधीचा हिशेब कुठे आहे?

संघटनेने दिलेल्या मदतीचा हिशेब न दिला म्हणजे भ्रष्टाचार, असे जर मोहोळ मानत असतील तर मग त्यांच्या संस्थेने मिळवलेल्या एक कोटींच्या सरकारी निधीचा हिशेब कुठे आहे? त्यांच्या पाठीशी असलेल्या सात-आठ संघटनांनीही हिशेब दिलेला नाही. आता आम्हीही तसेच म्हणालो तर कसं वाटेल? असा टोलाही देशमुख यांनी मोहोळ यांना लगावला.