
अभिधानंतर
संपादक, कवी हेमंत दिवटे यांच्या ‘अभिधानंतर’ या दिवाळी अंकात आपल्याला कविता आणि दर्जेदार लेख वाचायला मिळणार आहेत. सर्वप्रथम या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठं आपलं लक्ष वेधून घेतं. विचारात हरवलेली महिला वेगवेगळ्या रंगछटांमधून त्यावर रेखाटण्यात आली आहे. 271 पानांच्या या दिवाळी अंकात आपल्याला पन्नासहून अधिक कवी व कवयित्रींच्या कवितांचा आस्वाद घेता येणार आहे, तर त्यानंतर 33 लेखकांचे विचारदेखील त्यांनी या दिवाळी अंकातून मांडले आहेत. असा कविता व लेखांचा उत्तम फराळ या दिवाळी अंकातून आपल्याला चाखायला मिळणार आहे.
संपादक : हेमंत दिवटे, पृष्ठे : 271, मूल्य : 399 रुपये
धगधगती मुंबई
‘धगधगती मुंबई’च्या या वेळच्या दिवाळी अंकात सामाजिक प्रश्नांसह इतर अनेक विषयांना स्पर्श केला आहे. समाजाची सद्यस्थिती, बदलत्या काळाचा आढावा आणि संस्पृतीशी निगडित मान्यवरांचे लेख अंकात आहेत. ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, प्रताप गंगावणे, अॅड. संग्राम शेवाळे, अॅड. स्मिता चिपळूणकर, कविता पांचाळ, प्रा. हेमंत सामंत, ओमकार धुळप यांचे लेख वाचनीय आहेत. त्याशिवाय अंकातील इतरही नवोदित लेखक आणि कवींचे साहित्य वाचावे असे आहे. विद्यावाचस्पती विजयपुमार स्वामी यांचे राशीभविष्यदेखील या अंकात आहे. अंकाचे मुखपृष्ठ सुंदर आहे.
संपादक : भिमराव धुळप, पृष्ठे : 110, मूल्य : 200 रुपये
महानगरी वार्ताहर
हा अंक ‘क्रीडा साधना’ या स्वरूपात वाचकांच्या भेटीस आला आहे. क्रीडा संस्पृती जोपासणाऱ्या क्रीडा भारती या संस्थेविषयी अंकात सविस्तर माहिती आहे. विश्वविजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिच्या यशाचे पैलू रघुनंदन गोखले यांनी उलगडले आहेत. त्याशिवाय अनुजा दाभाडे, जयंत गोखले, मिलिंद ढमढेरे, डॉ. आरती लिमये, डॉ. अलोक देवधर, श्रीकांत पाराशर, श्रीपाद पेंडसे, श्वेता सरदेसाई, केतकी गोरे-उत्पाद यांचेही लेख वाचनीय आहेत.
मुख्य संपादक : सतीश सिन्नरकर,
पृष्ठे : 179, मूल्य : 200 रुपये































































