
>> सुधाकर वसईकर
काही ग्रंथ मुखपृष्ठातूनच वाचकांशी बोलू लागतात. हातात पेन धरून टेबलाजवळ वाकून बसलेली अर्धमनुष्याकृती दिसते. त्यावर गझल आकृतिबंधातील काफिया, मतला, तंत्रशुद्धता, यती, तंत्रशरणता, मात्रावृत्त आदी लिहिलेले शब्द सूचित करतात की, दोन ओळींचा शेर लिहिण्यासाठी कितीतरी घटकांचा खोलवर विचार करावा लागतो. तेव्हा कुठे मानवी जीवनदर्शनाच्या कुठल्या तरी पैलूचा उत्कट प्रत्यय देणारा शेर कागदावर उतरतो. या चित्रभाष्य सूचनांतूनच श्रीकृष्ण राऊत लिखित ‘गझलेचे उपयोजित छंदःशास्त्र’ ग्रंथाचा वाचकांशी सुरू झालेला मुक्त संवाद ग्रंथअखेरीपर्यंत सुरूच राहतो.
सुरेश भटांच्या पिढीनतंरचे श्रीकृष्ण राऊत हे मराठी गझल क्षेत्रातील एक सुपरिचित, अग्रगण्य नाव! त्यांची गझल साहित्य संपदा विपुल आहे. आजमितीस लिहिल्या जाणाऱया गझलेची पायाभरणी माधवराव पटवर्धन आणि सुरेश भट यांनी केली असून त्यांच्या बहुमोल योगदानाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी मनोगतात प्रांजळपणे सांगितले आहे. अमरावतीच्या अखिल भारतीय मराठी संमेलनातील परिसंवादाकरिता श्रीकृष्ण राऊत यांनी ‘मराठी गझल ः तंत्रशुद्धता की तंत्र शरणता’ हा निबंध लिहिला होता. त्याला पुढे जाऊन रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जवळ जवळ वीस वर्षे सातत्याने छंदःशास्त्राचा बारकाईने अभ्यास करून, अनेक संदर्भ तपासून, त्यांनी आपली परखड मते मांडून गझलनामा सिद्ध केला आहे.
श्रीकृष्ण राऊत यांचे वृत्तांवर विलक्षण प्रभुत्व असल्याने छंदःशास्त्राची थिअरी अर्थात तात्त्विक बाजू सहजसोप्या भाषेत समोर येते. एकूण 17 मुख्य प्रकरणे आणि 62 उपप्रकरणांतून गझलेतील पारिभाषिक संज्ञाचे अर्थ, संस्कृत छंदःशास्त्र आणि अरबी-फारसी अरुजःतुलनात्मक विश्लेषण, प्रारंभिक मराठी अरबी-फारसी वृत्ते, गझलेच्या वृत्तांचे वर्गीकरण, लवचिकता, यतिस्थान, काफिया, स्वरकाफिया, रदीफ, शेर, तसेच ‘गझलांच्या वृत्तांचे वर्गीकरण’ प्रकरणात छोटी वृत्ते 19, मध्यम वृत्ते 53, मोठी वृत्ते 10 आणि मात्रा वृत्ते 8 आदींची चर्चा उत्तरोत्तर झडत जाते. वृत्तानुसार त्याचे नाव, प्रकार, शेर, मात्रा लगावली. तब्बल 90 सारण्यांतून (कोष्टक) उदाहरणासह आल्याने वृत्त आकलन होऊन मात्रा मोजणीतील कठीणपणही सुलभ वाटायला लागते.
गझलेची भाषा प्रकरणात, गझलेची भाषा कठीण असते का? भाषेची शुद्धाशुद्धतेबाबतचे सखोल विवेचन आहे. गझलेत इतर भाषेतील शब्द वापरावेत का? या मतप्रवाहाबाबतही मौलिक मार्गदर्शन केले आहे. सुरेश भटांनी अरबी, फारसी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजीतील शब्द वापरून गझलेची अभिव्यक्ती समृद्ध केली आहे. सुरेश भटांच्या गझलेत इतर भाषेतून आलेल्या शब्दांचे निरीक्षण करून, बहुतांश काफियात आलेल्या 105 शब्दांचे, सर्व शेर ग्रंथात नमूद केले आहेत. ते वाचणे रसिकांसाठी एक पर्वणी आहे. इतर भाषेतील शब्दवापर मराठी गझलेसाठी वर्ज्य नसल्याचे ठाम समर्थनच त्यांनी यातून केले आहे.
मराठी गझलेच्या आजवरच्या वाटचालीतील बऱयाच घटनांची चर्चाही उद्बोधक, रंजक आहे. शुभानन चिंचकर यांच्या, रस्ता ः एक रदीफ ः 76 गझला, हेमलता पाटील यांची 51 शेरांची गझल, मुनव्वर राणा 558 शेरांची एकच गझल आणि प्रकाश पुरोहित 250 शेरांची एक गझल आदि आणि इतरही सूक्ष्म बाबींचे ज्ञानवर्धक उल्लेख थक्क करणारे आहेत. तसेच प्रस्तुत ग्रंथात छंदःशास्त्राच्या उपयोजनाबद्दलच्या चर्चेत, मराठी शेर तसेच नावाजलेल्या हिंदी शायरांच्या जवळपास 200 शेरांची बखुबीने जागोजागी केलेली पेरणी म्हणजे गझलेची ग्रंथात रंगलेली मैफलच वाटते. विशेष म्हणजे कोणत्याही शेराची पुनरुक्ती झालेली आढळून येत नाही.
276 पृष्ठसंख्या असलेल्या प्रस्तुत ग्रंथाचा आवाका खरंतर खूप मोठा आहे. छोटय़ा छोटय़ा परिच्छेदांची आटोपशीर उप प्रकरणे केली असून, प्रकरणांच्या उपसंहारातील निष्कर्ष विधानांची सौंदर्यपूर्ण भाषा, ग्रंथाची सुरेखता दर्शविणारी आहे. शिवाय महत्त्वाचे संदर्भ मुद्रणातच अधोरेखित केल्याने ठळकपणे समोर येतात. ग्रंथअखेरीस असलेल्या 6 परिशिष्टांपैकी चौथे परिशिष्ट ‘मराठी गझल ः काही गैरसमज’ अत्यंत महत्त्वाचे आहे.
मराठी गझलेविषयीचे 7 गैरसमजांचे तपशीलवार विवेचन गझलेच्या आकृतिबंधाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी बहाल करणारे आहे. ते वाचताना वाचक ग्रंथातील मागील प्रकरणात पुन्हा डोकावण्यास प्रवृत्त होतो. जेणेकरून मराठी गझलेच्या लेखनात वृत्त, भाषा, विषय आणि शैलीविषयीचे गैरसमज दूर होऊन गझलेचे व्यापक स्वरूप वाचकांच्या लक्षात येईल. गझल लिहिणारे नवोदित असो वा ज्येष्ठ गझल अभ्यासक, सगळ्यांनाच मार्गदर्शक असून, गझलेविषयी असलेले संभ्रम सहज निरसन करणारा संशोधनपर ग्रंथ संग्राह्य असा आहे. अविनाश सांगोलेकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. सतीश पिंपळे यांनी चितारलेले अतिशय बोलके, सूचक, अर्थपूर्ण मुखपृष्ठ खासच!
गझलेचे उपयोजित छंद–शास्त्र
लेखक ः श्रीकृष्ण राऊत
प्रकाशक ः स्वयं प्रकाशन
पृष्ठ ः 276, ह मूल्य ः रुपये 400/-




























































