
>> डॉ. मीनाक्षी पाटील
मानवी स्वभावातील विविध द्वंद्वाच्या पलीकडील जे सर्वव्यापी असे एकत्व आहे त्याचा निरंतर शोध विविध कलांमधून प्रकट होत असतो. या अर्थाने सर्व कला या वैश्विक, सार्वकालिक ठरतात. कलेतील समान मूलभूत तत्त्व वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत कलांमधील एकात्म अनुभवाचे दर्शन घडवणारा असा व्यापक अर्थ म्हणजेच कलेतील सारतत्त्व.
मनुष्यजात हजारो वर्षांपासून भवतालातील जड आणि चैतन्याच्या नेमक्या नात्याचा शोध विविधांगाने घ्यायचा प्रयत्न करतेय. आजच्या आधुनिक भौतिकीच्या दृष्टिकोनातूनही जड -चैतन्य,भौतिक वस्तू – रिकामे अवकाश म्हणजेच भरीवता व पोकळी या एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या अशा दोन स्वतंत्र संकल्पना मानल्या जात नाहीत. आपल्या भवतालातील सर्व भौतिक वस्तू या स्वतंत्र अस्तित्व असणाऱया एकाकी गोष्टी नसून त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीशी त्यांचा अविभाज्य असा संबंध असतो, त्यांच्यात द्वैत नसून एक आंतरिक अनुबंध असतो असे आधुनिक भौतिक शास्त्रानुसार मानले जाते. आधुनिक क्वांटम क्षेत्र सिद्धांतात तर भरीवता व पोकळी म्हणजे आकार व निराकार यातील भेदच पूर्णपणे नाकारला गेला असून या सिद्धांतानुसार परमाणू हे कोणत्याही भौतिक पदार्थांनी बनलेले नसतात, तर ते केवळ एकमेकांत रूपांतरित होत असलेले ऊर्जेचे आकृतिबंध असतात.
मानवी संस्कृतीच्या इतिहासातही या ऊर्जेच्या विविध आकृतिबंधांतून व्यक्त होणाऱया एकत्वाचाच वेध विविध विचार, परंपरांमध्ये, विविध कलांमध्ये सातत्याने घेतलेला दिसतो. मानवी स्वभावातील स्त्राr-पुरुष तत्त्व, जड-चेतन, आकार-निराकार, अवकाश व काळ अशा विविध द्वंद्वाच्या पलीकडील जे सर्वव्यापी असे एकत्व आहे त्याचाच निरंतर शोध विविध कलांमधून प्रकट होत असतो. याच अर्थाने सर्व कला या वैश्विक असतात, सार्वकालिक ठरतात. आपण चित्रकला, संगीत, साहित्य अशा विविध कलांचा जर विचार केला तर त्यांची माध्यमे जरी वेगवेगळी दिसत असली तरी त्या सर्व कलांमध्ये ज्याला ‘कला’ म्हणता येईल असे काहीतरी समान मूलभूत तत्त्व असते असा विचार प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झालेला दिसतो.
भारतीय सौंदर्य विचारावर आणि साहित्य शास्त्रावर कश्मिरी शैवपंथीय तंत्र विचाराचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. या पंथातील आनंदवर्धन यांच्या ‘ध्वन्यालोक’ ग्रंथावर व भरतमुनींच्या नाटय़शास्त्रावर अभिनवगुप्ताने लिहिलेल्या टीका या भारतीय कला विचारात, सौंदर्य विचारात फार महत्त्वाच्या मानल्या जातात. ‘ध्वन्यालोक’ या ग्रंथाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे त्यात ‘अभिधा’ आणि ‘लक्षणा’ या दोन शब्दशक्तींसोबत व्यंजना या शक्तीला विशेष महत्त्व दिलेले आहे. बऱयाचदा साहित्य चर्चेत ‘व्यंजना’ या संज्ञेचा ‘सूचक अर्थ’ असा मर्यादित अर्थ घेतला गेलेला दिसतो, परंतु प्राचीन साहित्यशास्त्रकारांनी ‘व्यंजना’ या संज्ञेचा ‘सारतत्त्व’ असा व्यापक अर्थ विचारात घेतलेला दिसतो. आनंदवर्धनाने तर ‘व्यंजने’ची चर्चा करताना ‘अनुरणन’ ही संगीत शास्त्रातील संकल्पना वापरलेली आहे. संगीत क्षेत्रातील मातंग मुनी, शारंगदेव यांसारख्या संगीतशास्त्रकारांनीही व्यंजनेशी संवादी अशी ‘अनुरणन’ ही संकल्पना आपापल्या परीने स्पष्ट केलेली दिसते.
प्राचीन साहित्यशास्त्रकार साहित्यातील ‘व्यंजना’ ही संकल्पना समजावताना संगीतशास्त्रातील ‘अनुरणन’ ही संकल्पना वापरतात, तर प्राचीन संगीतशास्त्रकार ‘श्रुति-स्वर’ समजावताना साहित्य शास्त्रातील ‘व्यंजना’ या संकल्पनेचा आधार घेताना दिसतात. थोडक्यात, प्राचीन संगीत शास्त्रात व प्राचीन साहित्य शास्त्रात ‘अनुरणन’ आणि ‘व्यंजना’ या संकल्पना समान अर्थाने वापरल्या जात होत्या असे दिसते.
भरताच्या नाटय़शास्त्र विचारात ‘व्यंजना’ या संज्ञेचे स्पष्टीकरण अधिक विस्ताराने केलेले आढळते. भरताच्या मते रंगमंचावरील पात्रे, त्यांचे पोषाख, नेपथ्य, अभिनय अशा विविध नाटय़ घटकांच्या एकत्रित मिलापातून ज्या विविध भावभावनांचे संघटन होते व त्यातून त्या सर्वांच्या पलीकडची एक आगळीवेगळी अशी जी भावावस्था निर्माण होऊन रसिकाला अनुभवाला येते, तिला त्याने ‘व्यंजित सामान्यगुणयोगेन रस’ म्हटले आहे. नाटय़शास्त्रातील रसनिर्मितीसंदर्भात भरताने उद्धृत केलेली ही भावावस्था खरे तर सर्वच कला माध्यमांमधून व्यक्त होणाऱया भावनाविष्काराला लागू पडते. नाटकातील नाटय़ घटक, संगीतातील स्वरमेळ, चित्रकलेतील रंगानुभव अशा विविध कलांमध्ये विविध घटकांच्या संघटन मिलापातून निष्पन्न होणारा, व्यंजित होणारा भावनाविष्कार फार महत्त्वाचा असतो. भरताने ‘व्यंजित सामान्यगुणयोगेन रस’ असे ज्याला म्हटले त्यालाच आनंदवर्धनाने आपल्या ‘ध्वनिसिद्धान्ता’त ‘अनाकांक्षा प्रतिपत्तिकारी काव्यम्’ असे म्हटले आहे. या दोहोतून विविध कलांमधील विविध घटकांच्या संघटन मिलापातून निर्माण होणारा व ज्यात अधिकचे काही समाविष्ट करावे लागू नये किंवा काही वगळावे लागू नये असा एकात्म झालेला भावगर्भ गोळीबंद अनुभवच त्यांना व्यक्त करायचा आहे. ज्याला भरताने ‘रसानुभव’ म्हटले आहे, तर आनंदवर्धनाने ‘रसव्यंग’ म्हटले आहे.
थोडक्यात आनंदवर्धन, अभिनवगुप्त आणि विश्वनाथ या साहित्यशास्त्रकारांच्या मते ‘व्यंजना’ म्हणजे विविध घटकांच्या संघटन-मिलापातून निष्पन्न होणारे ‘सारतत्त्व’ होय व त्यासाठी त्यांनी चर्चा करताना वेळोवेळी संगीतातील ‘अनुरणन’ या संज्ञेचा वापर केला आहे. याचाच अर्थ ‘व्यंजना’ या संकल्पनेचा ‘सूचक अर्थ’ असा जो पारंपरिक मर्यादित अर्थ व्यक्त केला जातो त्यापेक्षा ‘सारतत्त्व’ या अर्थाने सर्व कलांमधील एकात्म अनुभवाचे दर्शन घडवणारा असा व्यापक अर्थ प्राचीन साहित्यशास्त्रकारांना खरे तर अपेक्षित होता असे दिसते. असाच विविध ज्ञान शाखांमधील, कलांमधील ‘सारतत्त्वा’चा वेध घेण्याचा प्रयत्न आपण या लेखमालेतून करणार आहोत .




























































