पनवेलमध्ये अजबगजब… मतदारांची नावे रर, हह, दद; मतदार यादी भाग क्रमांक 390 मध्ये असाही घोटाळा

मतदार यादीतील घोटाळ्यांमागून घोटाळे बाहेर पडत असताना पनवेल विधानसभा मतदारसंघात एक अजबगजब प्रकार उघडकीला आला आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक 390 मध्ये एका महिला मतदाराचे नाव चक्क रर, हह असे असल्याचे समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे तिच्या नवऱ्याचे नाव कक, दद असे यादीत नोंदवण्यात आले आहे. हे रर, हह, कक आणि दद मतदार त्यांचे नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडतात काय असा सवाल विचारला जात आहे.

मतदार यादीत दुबार आणि बोगस मतदारांनी घुसखोरी केल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते मतदार याद्या तपासत आहेत. त्यातून रोज निवडणूक विभागाच्या नवनवीन भानगडी समोर येत आहेत. पनवेल विधानसभा क्षेत्रातील यादी भाग क्रमांक 390 मध्ये मतदार क्रमांक 388 यासमोरील एका महिला मतदाराचे नाव रर आणि हह असे नोंदवण्यात आले आहे. तर तिच्या पतीचे नाव कक आणि दद असल्याचे समोर आले. मनसेचे महानगरप्रमुख योगेश चिले यांनी हा घोळ शोधून त्याचा जाब निवडणूक आयोगाला विचारला आहे. अशा प्रकारची नोंद केलीच कशी?, नोंदणी करणारे निवडणूक अधिकारी कोणत्या धुंदीत होते, असा सवाल त्यांनी विचारला आहे.