बिबट्याच्या हल्ल्यात 30 वर्षीय महिला गंभीर! हिवरगाव पावसात भीतीचे सावट

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शनिवारी (दि.1) सायंकाळी शेतातून घरी परतणाऱ्या 30 वर्षीय महिलेला बिबट्याने अचानक लक्ष्य केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमीचे नाव अर्चना संदीप टेमगिरे 30, हिवरगाव पावसा) असे असून, त्या शेतकाम आटोपून घरी परतत असताना बिबट्याने अचानक झडप घालून हल्ला केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा संचार झपाट्याने वाढला असून, अनेक गावांमध्ये दिवसा ढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासन आणि वन खात्याने वेळीच योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी जखमी महिलेची भेट घेत धीर दिला.