
<<< सुनील उंबरे >>>
जाता पंढरीशी सुख लागे जीवा…या संत उक्ती प्रमाणे कार्तिकी वारीचा सोहळा साजरा करण्यासाठी सात लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी पंढरी नगरीत हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली दिसली. मात्र उपस्थित भाविकांमध्ये उत्साह कायम होता. पहाटेपासून वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी मोठी गर्दी केली होती. बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठलाचा नामघोष करीत चंद्रभागेत डुबकी मारल्यानंतर भाविकांनी नगरप्रदक्षिणा घेण्यासाठी गर्दी केली.
एकादशीच्या पर्वणीवर श्री विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी वारकरी गोपाळपूर दर्शन रांगेकडे जाताना दिसत होते. तब्बल पंधरा ते अठरा तास दर्शन रांगेत उभे राहिल्यानंतर देवाचे पददर्शन मिळत होते. भाविकांच्या गर्दीने चंद्रभागा वाळवंट, मठ, धर्मशाळा, मंदिर, संस्थाने, भक्तीसागर भाविकांनी गजबजून गेले होते. तंबू, राहुट्यांमधून टाळ, मृदंगाच्या तालावर भजन, कीर्तन व प्रवचन सुरू असल्याने अवघी पंढरी भक्ती रसात न्हाऊन गेली होती.
पावसाने थैमान घातल्याने, महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा राज्यातील भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली. भाविकांची संख्या कमी झाल्याने साहजिकच पंढरपूरच्या बाजारपेठेवर त्याचे परिणाम दिसून आले. व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे वारी भरेल असा अंदाज बांधून दुकाने थाटली होती. मात्र हवा तसा प्रतिसाद बाजारपेठेत जाणवला नाही. तथापि आलेल्या भाविकांनी भजनी वाद्ये, धार्मिक पुस्तके, प्रासादिक साहित्य खरेदी करण्यावर भर दिलेला दिसला.
भक्तिसागर वारकरी भक्तीत तल्लीन
चंद्रभागेच्या पैलतीरी असलेल्या भक्तिसागर येथे 3 लाखांहून अधिक भाविक वास्तव्य करत आहेत. येथे वीज पाणी, शौचालये, प्रथमोचार केंद्र तसेच पोलीस सेवा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
विद्यार्थी मानाचे वारकरी
यावर्षी प्रथमच मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांची पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशीलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.



























































