
अरबी समुद्रात उसळलेल्या मोंथा वादळामुळे भरकटलेल्या अनेक मच्छीमार बोटींमधील ट्रान्सपॉट, व्हीटीएस, व्हीएचएन या यंत्रणा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या बोटी समुद्रात नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत याचा शोध घेण्यात तटरक्षक दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना अडचण येत होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. या विभागाने आज बोटींचे मालक मच्छीमार आणि खलाशांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षित मासेमारीसाठी मार्गदर्शन केले. सुरक्षा यंत्रणा बंद न करण्याच्या सूचनाही दिल्या.
सात दिवसांपूर्वी अरबी समुद्रात उसळलेल्या मोंथा वादळात राज्यातील अनेक मच्छीमार बोटी भरकटलेल्या होत्या. भरकटलेल्या मच्छीमार बोटी खलाशांसह सुखरूप विविध बंदरात दाखल झालेल्या आहेत. मात्र या वादळात भरकटलेल्या मच्छीमार बोटींशी संपर्क होऊ शकला नसल्याने मालक, तांडेल, खलाशी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाने चौकशी केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमार बोटींतील ट्रान्सपॉट, व्हीटीएस आदी यंत्रणा बंद करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या यंत्रणांचा मच्छीमार वापर करण्याचे टाळत असल्याचे उघड झाले.
– भरकटलेल्या मच्छीमार बोटींमध्ये संपर्कासाठी असलेल्या या यंत्रणा कार्यान्वित नसल्यानेच या बोटींशी संपर्क साधणे शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी तातडीने आज या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सर्वांना सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याची शपथ देण्यात आली.
– सहआयुक्त युवराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करंजा येथील द्रोणागिरी देवीच्या सभागृहात हा जनजागृती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, रायगड जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील, परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे, अखिल महाराष्ट्र मच्छीमार महासंघाचे अध्यक्ष विकास दाभोळकर, उपाध्यक्ष विष्णू नाटेकर आदी उपस्थित होते.



























































