राज्यात हिवाळ्याचे आगमन लांबणार; पावसाचा नोव्हेंबरमध्येही मुक्काम, हवामान खात्याचा अलर्ट

राज्यात साधारणपणे दिवाशी संपल्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागते. मात्र, यंदा सलकर आलेला मॉन्सून अद्याप परतण्याचे नाव घेत नाही. परतीचा मॉन्सून राज्याच्या सीमेवरच रखडला आहे. तसेच आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा हिवाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

यंदा परतीच्या पावसाचा राज्याला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता नोव्हेंबरमध्येही परतीचा पाऊस राज्याला झोडपत आहे. बदल्या वातावरणामुळे राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

आता नोव्हेंबर महिना उजाडला, थंडीची चाहूल तर दूरच पण जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले असून सोमवारीही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत. मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी देखील मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर राज्यातील इतर भागांतही वेगाने वारे वाहतील, जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीची अद्याप चाहूल लागलेली नाही. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 6 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 6 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे. यंदा लवकर आलेल्या पावसाचा मुक्काम नोव्हेंबरपर्यंत लांबला आहे. त्यामुळे थंडीचे आगमनही उशीरा होणार आहे.