स्वागत दिवाळी अंकांचे

आवाज

‘आवाज’ या नामवंत दिवाळी अंकाचे हे अमृत महोत्सवी वर्ष. मधुकर पाटकर यांनी 1951 च्या दिवाळीत ‘आवाज’ वार्षिकाच्या प्रकाशनाला सुरुवात केली. 1953 मध्ये मुखपृष्ठापासून आतल्या आशयापर्यंत ‘आवाज’मध्ये अधिकाधिक विनोदी साहित्य आणि चित्रसाहित्य यांचा समावेश करण्यात आला. आजपर्यंत या अंकाने हे वैशिष्टय़ जपले आहे. यंदाच्या दिवाळी अंकातही त्याचा प्रत्यय येतो. डॉ. यशवंत पाटील, मुकुंद टाकसाळे, मंगला गोडबोले, श्रीकांत बोजेवार, अवधूत परळकर, सॅबी परेरा, मानसी होळेहोन्नूर, इर्शाद बागवान, सारिका कुलकर्णी यांचे लेख, सुरेश सावंत, प्रभाकर दिघेवार, संजय मिस्त्री, महेंद्र भावसार यांची हास्यचित्रे, संजय घाटे यांच्या वात्रटिका आणि इतर नेहमीच्या खुसखुशीत तसेच वाचकाला हसवणाऱया हास्यचित्र-मालिका यांनी अंकात बहार आणली आहे.

संपादक ः भारतभूषण पाटकर

पृष्ठ ः 236, मूल्य ः 450 रुपये

 

जनतेचे पत्रीसरकार

साप्ताहिक ‘जनतेचे पत्रीसरकार’ या दिवाळी अंकाचे हे 26 वे वर्ष. कथा, कविता, ललित लेख, विशेष लेख, चारोळ्या यांनी अंक सजला आहे. अतिवृष्टीने बेजार झालेला शेतकरी, मतदार यादीतील घोळ अशा समस्यांबाबत प्रश्न विचारत या अंकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशेष लेख विभागात समाजवाद, हुंडा, कृत्रिम बुद्धिमत्ता, मुलांमधील मोबाईलचा वापर, महिला सबलीकरण, कायदा अशा महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आधारित लेख आहेत. या वैचारिक लेखांसोबत मनोरंजन करणारे ललित लेखही वाचकांना आवडतील असे आहेत.

संपादक ः अशोक परदेशी

पृष्ठ ः 240 मूल्य ः रु. 250/-

प्रभू प्रभात

‘प्रभू प्रभात’चा यंदाचा दिवाळी अंकही वाचनीय झाला आहे. कथा, लेख, कविता यांची मेजवानी वाचकांना देण्यात आली आहे. सीए प्रणाली धराधर, मिलिंद कोठारे, छाया विजयकर, माधव जयकर, श्रद्धा नवलकर-राजाध्यक्ष, अंजली तळपदे, भैरवी देसाई आदींचे लेख, डॉ. सुमन नवलकर यांच्या वात्रटिका, प्रकाश तळपदे यांचा ‘पाठारे प्रभूंची परंपरा आणि खाद्य संस्कृती’ हा लेख अंकात आहे.

संपादिका ः वृंदा शाम जयकर

पृष्ठ ः 92, मूल्य ः 25 रुपये

केतकी

‘केतकी’चा यंदाचा दिवाळी अंक कला, समाज आणि संस्कृतीदर्श विशेषांक म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंकात वाचन संस्कृती, समाजभान आणि सर्जनशीलतेचा संगम साधला आहे.  ‘संस्कृतीदर्श आणि ग्राम्शी’ हा पंकज चाळके यांचा लेख, ‘बांगलादेशातील महिला – एक समय प्रवास’ हा समीरा खान यांचा लेख, ‘नागपंचमी आणि रक्षाबंधन’ हा कृष्णा घुले यांचा लेख अंकात आहे. युरोपियन जगाचा तात्त्विक इतिहास अरुण वाघ यांनी उलगडला आहे. डॉ. योगेंद्र पाटील, प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार, लीना पांढरे, डॉ. अविनाश कोल्हे आदींचे साहित्य वाचनीय आहे.

संपादक ः चंद्रकांत जाधव

पृष्ठ ः 275 मूल्य ः 300 रुपये

सांगली कृष्णाकाठ

या अंकात काळाच्या उदरात डोकावण्याचा आणि कर्तृत्वाची खाण धुंडाळण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. काही मान्यवर व्यक्तिरेखा अंकात वेगळ्या पद्धतीने उलगडण्यात आल्या आहेत. महाप्रजापती गौतमी (दीपाली पाटील), मी दिद्दा ः कश्मीरची राणी (दीपक वानखेडे), कोटाराणीची कथा (दीपक पाटील), सातकर्णीचे आत्मस्वर ः नागनिका (शंभोराज काटकर) आदी लेख वाचनीय आहेत.

संपादक ः शंभोराज काटकर

पृष्ठ ः 145, मूल्य ः 300 रुपये

सुहास्यजत्रा

ग्रामीण विनोदी कथा हे वैशिष्टय़ यंदाच्या ‘सुहास्यजत्रा’च्या दिवाळी अंकाने जपले आहे. शंकर इनामदार, अरुण नासिककर, प्रा.किशोर मोरे, भगवान हिरे, अरुण वगळ, शशिकांत भंडारे, गुलाब नदाफ आदींचे साहित्य अंकात आहे. वसंत गवाणकर, प्रभाकर ठोकळ, चिं. ग. मनोहर, प्रभाकर झळके, विवेक मेहेत्रे, अरुण मोरे, अरुण मयेकर आदींच्या व्यंगचित्रांचा साज अंकाला देण्यात आला आहे.

संपादक ः अरुण नासिककर

पृष्ठ ः 104, मूल्य ः 240 रुपये

अनलॉक

‘व्यक्तिमत्त्वे अनलॉक’, ‘जगभरातील समुदाय’, ‘जागतिक चळवळी व आंदोलने’, ‘जागतिक प्रथा आणि परंपरा’ यानंतरचा हा  पाचवा अंक. या अंकाची संकल्पना आहे- ‘जग बदलून टाकणाऱया महिला’. कर्तृत्ववान स्त्रियांच्या कारकीर्दीचा अभ्यासपूर्ण आणि रंजक आढावा या अंकात घेतला गेला आहे. डॉ. दीपक बोरगावे यांचा नायजेरियन वंशाची स्त्राrवादी लेखिका चिमांदा न्गोंझी अडिचे यांच्यावरचा लेख, विनोद पंचभाईंचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरचा लेख, राजेश मंडलीक यांचा इंद्रा नुयी यांच्यावरचा लेख, रुचिरा सावंत यांचा भारतीय वैज्ञानिक लेख हे सर्वच वाचनीय झाले आहेत.

संपादक ः रश्मी पदवाड मदनकर

पृष्ठ ः 108  मूल्य ः 300 रुपये