
फलटणमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार-आत्महत्या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबईसह राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेले ‘काम बंद’ आंदोलन दुसऱया दिवशीही सुरू राहिल्याने आरोग्य सेवा कोलमडली आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले. पालिकेसह सरकारी रुग्णालयांमधील ओपीडी थेट 20 ते 25 टक्क्यांपर्यंत खाली आली. शिवाय शेकडो शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
प्राध्यापकांनी चालवली ओपीडी
शीव रुग्णालयात दररोज सुमारे सहा हजार रुग्ण ओपीडीमध्ये येतात. ही संख्या एक हजारावर आल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. तर दररोज 400 पर्यंत होणाऱया शस्त्रक्रिया 50 पर्यंत खाली आल्याचेही ते म्हणाले. ओपीडी सेवा प्राध्यापकांनाच चालवावी लागली. नायरमध्येही रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले. रुग्णालयात सध्या इमर्जन्सी सेवा दिल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.































































