शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा होत नाहीत, शिंदे गटाच्या मंत्र्यांचा घरचा अहेर; खरेदी केंद्रांवरून अजित पवार संतापले

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली. सरकारने शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले, पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसेच जमा होत नाहीत, अशा शब्दांत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुती सरकारला घरचा अहेर दिला. खरेदी केंद्रांच्या मुद्द्यावरून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पूरग्रस्तांना मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीवरूव खडाजंगी झाली होती. राज्याचे मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी मागील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही अशी तक्रार केली होती. त्यानंतर आज झालेल्या बैठकीतही हाच मुद्दा उपस्थित झाला. सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 32 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे महायुती सरकारमधील मंत्र्यांचाच आरोप आहे.

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. याचा आम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतो. अधिकाऱ्यांना कोणी विचारत नाही, अशा शब्दांत आक्रमक पवित्रा घेतला.

तक्रारी गांभीर्याने घ्या – फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्याकडे याबाबत तक्रारी आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण जाहीर केलेले पैसे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. धाराशीव, सोलापूर, संभाजीनगरमध्ये मदत गेली. इतर तक्रारी गांभीर्याने घ्या, अशा शब्दांत प्रशासनाला फटकारले. त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बाजू मांडली. आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण अजूनही काही भागांत अतिवृष्टी सुरू आहे. एका ठिकाणचे पंचनामे केल्यावर पुन्हा पाऊस येतो मग पुन्हा पंचनामे करावे लागतात. आमचे काम सुरू असल्याचा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला.