Abhishek Sharma – युवीच्या मार्गदर्शनाखाली अभिषेकची आकाशात झेप

हिंदुस्थानचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग आता प्रशिक्षक आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत चमकतोय. आपल्या पहिल्या इनिंगमध्ये स्वतःसाठी खेळून त्याने हिंदुस्थानला जिंकवलं, आता दुसऱया इंिनंगमध्ये तो नव्या पिढीला निर्भीड, बिनधास्त खेळायचे धडे देतोय. त्याचा हा नवा प्रवास सध्या सुसाट वेगाने सुरू आहे.

कारकीर्दीच्या प्रारंभी युवराजच्या मनात अनेक शंका होत्या, भीती होती. त्याबद्दल तो म्हणाला, ‘जेव्हा मी 19 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या मनात काय चाललंय, हे कुणी डोकावून पाहू शकेल, असं कुणी नव्हतं. आता अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसारख्या तरुणांना पाहताना मला कळतं, त्या वयात मनात किती वादळं असतात.’

युवीच्या म्हणण्यानुसार, कोचिंग म्हणजे काय करायचं ते सांगणं नव्हे, तर ‘का आणि कसं विचार करतोय’ हे समजून घेणं आहे. कोचिंग हा एक प्रवास आहे, आदेश नाही.

युवराजने कबूल केलं, ‘जेव्हा मी क्रिकेटच्या शेवटच्या वळणावर होतो तेव्हा अभिषेक आणि शुभमनबरोबर थोडं अनुभव शेअर करत होतो, पण नंतर लक्षात आलं की ही फक्त शिकवण्याची गोष्ट नाही, हा एक प्रवास आहे. टॅलेंट कसं फुलवायचं, हेच या प्रवासाने मला शिकवलं.’

भयमुक्त क्रिकेट हीच खरी ताकद

अभिषेक शर्माने हिंदुस्थानी टी-20 संघात ज्या आत्मविश्वासाने फलंदाजी केली त्याचं रहस्य युवराजने उघड केलं. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या मुलांना ‘भीतीशिवाय खेळा’ ही परवानगी दिली आणि जिथे भीती संपते, तिथूनच धडाकेबाज क्रिकेट सुरू होतं.

2011 वर्ल्ड कपचा संदर्भ देत युवराज म्हणाला, ‘तेव्हा कोच गॅरी कर्स्टन म्हणायचे, तू तुझ्या स्टाइलने खेळ, संघाला जिंकवशील. आज तोच आत्मविश्वास अभिषेकच्या खेळात दिसतो.’

चार वर्षांच्या श्रमाचं आणि घामाचं फळ

लोक म्हणतात अभिषेक अचानक चमकला. पण मला माहीत आहे. ही चार-पाच वर्षांची मेहनत आहे, तयारी आहे. त्याची मेहनत, काम करण्याची पद्धत अप्रतिम आहे. लोक जे बघतात ते फक्त परिणाम आहे, पण त्याच्या मागे रोजच्या घामाची कहाणी आहे.

मी योगराजसारखा कठोर नाही!

वडिलांशी तुलना होताच युवराज हसतो आणि म्हणतो, ‘मी माझ्या वडिलांसारखा कठोर नाही. माझी पद्धत वेगळी आहे. मी शिकवताना समोरच्याच्या नजरेतून पाहायचं शिकतो. कोचिंग म्हणजे ‘थोडं देणं, थोडं घेणं असतं,’ असेही युवराजने आवर्जून सांगितले.