परळ रेल्वे पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांकडून दंड वसुली करू नका, शिवसेनेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

सवाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल एमएमआरडीएने जमीनदोस्त केल्यामुळे स्थानिक नागरिक पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी परळ रेल्वे पुलाचा वापर करत आहेत, मात्र रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून नाहक दंड वसूल करत आहे. या पार्श्वभूमीवर परळ रेल्वे पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुली करू नका, अशी मागणी शिवसेनेने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

वरळी-शिवडी कनेक्टरसाठी सवाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल जमीनदोस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. या पुलाच्या जागी डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल पाडल्यामुळे परळ, भोईवाडा, नायगाव, शिवडी येथून फुलबाजार, भाजी मार्पेट येथे जाणाऱया स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत आहे. नाइलाजास्तव अनेकजण पूर्व-पश्चिमेला ये-जा करण्यासाठी परळ रेल्वे पुलाचा वापर करत आहेत, परंतु रेल्वे टीसी स्थानिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून दंड वसुली करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी परळच्या स्टेशन मास्तरांची भेट घेऊन स्थानिकांकडून दंड वसुली करू नये अशी मागणी केली आहे.