बिहारमध्ये 65 टक्के मतदान; दगडफेक, शेणफेक आणि बहिष्काराचे गालबोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी आज 64.70 टक्के मतदान झाले. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही काही ठिकाणी मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. कुठे दगडफेक, कुठे बहिष्कार तर कुठे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार घडला. लखीसराय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्या कारवर शेण फेकण्यात आले.

पहिल्या टप्प्यात झालेले गेल्या 75 वर्षांतील हे विक्रमी मतदान आहे. इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजय सिन्हा व तेजप्रताप यादव या दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.

वाढलेले मतदान कोणाचे?

मतदानाच्या वाढीव टक्क्यामुळे उत्सुकता वाढली आहे. वाढीव मतदान हे विद्यमान सत्ताधाऱ्यांविरुद्ध असलेल्या रोषातून केले जाते, असा इतिहास आहे. इंडिया आघाडीने निवडणूक प्रचारात जोरदार मुसंडी मारली होती. मतदार अधिकार यात्रेतून संपूर्ण राज्य ढवळून काढले होते. त्याचा परिणाम मतदान वाढीत झाला असण्याची शक्यता आहे.