लग्नाचे आमिषः दोन महिलांना कोट्यवधींचा गंडा

लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांना दीड कोटी रुपयांना भामट्यांनी फसवल्याचे समोर आले आहे. जीवनसाथी अॅप आणि इंस्टाग्रामवरील मैत्री महिलांना चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी अनिल दातार, शैलेश रामगुडे यांच्या विरोधात विष्णू नगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पतीपासून विभक्त होऊन मुलासह डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेने जीवनसाथी संकेतस्थळावर नाव नोंदवले. तिची ओळख मानपाडा येथील रहिवाशी अनिल दातार याच्याशी झाली. त्यांची ओळख वाढली आणि विवाहाविषयी बोलणी सुरू झाली. पत्नीसोबत घटस्फोट झाला की आपण लग्न करू असे अनिलने सांगितले. यानंतर अनिलने घटस्फोटाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी, पीडितेच्या भावाला नोकरी लावण्यासाठी, दिल्लीतील आपल्या सहकाऱ्याला आलेली आर्थिक अडचण अशी विविध कारणे सांगून त्याने महिलेकडून ६२ लाख ७५ हजार रुपये उकळले. दुसऱ्या प्रकरणात ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या शैलेश रामगुडे (३०) या तरुणाने डोंबिवलीतील ३० वर्षीय महिलेशी इंस्टाग्रामद्वारे ओळख केली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि शैलेशने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर शैलेशने पीडितेला आपल्या घरावर ईडीची धाड पडली असून दोन किलो सोने आणि एक कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ते सोडवण्यासाठी आर्थिक मदत लागेल असे सांगितले. यावर विश्वास ठेवून तरुणीने शैलेशला सोन्याचे दागिने व रोख मिळून ९२ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज दिला. मात्र त्यानंतर शैलेशने लग्न करण्यास नकार देत पैसेही परत केले नाहीत.