जे. जे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्या, मनोज जामसुतकर यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात राज्यासह देशाच्या कानाकोपऱयातून गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयाच्या आवारात सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचे काम सुरू आहे; मात्र निधीअभावी या रुग्णालयाचे काम रखडले आहे. रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यास पाच ते सहा वर्षांचा विलंब लागेल. त्यामुळे या रुग्णालयाच्या कामाला तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुरुवारी केली.

‘‘जे.जे.’साठी रिचर्डसन क्रूडासची जागा

जे.जे. रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी शेजारील पेंद्राच्या अखत्यारीतील रिचर्डसन अँड क्रूडास पंपनीची जागा आहे. लीजची जागा आहे. ती जागा मिळावी अशी मागणी मनोज जामसुतकर यांनी केली. त्यावर आम्ही काम सुरू करीत असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

बीआयटी चाळींचा पुनर्विकास

माझगाव ताडवाडी बीआयटीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मागील वीस वर्षांपासून रखडला आहे. याचबरोबर लव लेन, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल बीआयटी चाळींचे प्रकल्प रखडले आहेत. बीडीडी आणि अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक निर्णय झाला. त्याच पद्धतीने बीआयटी चाळींच्या पुनर्विकासासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली.