
पाणीपुरवठा योजनेचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराला डहाणूतील चळणी ग्रामपंचायतीने पूर्ण पैसे दिले आहेत. ठेकेदाराने पाण्याची टाकी बसवली पण मुख्य पाइपलाइनला जोडलीच नाही त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. लाखो रुपये खर्चुन ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
मुबलक पाऊस पडूनही पालघरमधील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांची फरफट थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून 2024 मध्ये चारीचामाळ पाड्यात पाणीपुरवठा योजना राबवली होती. पाड्यातील ५२ कुटुंबांसाठी पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसवून त्या ठिकाणी चार नळ बसवण्यात आले होते. मात्र टाकीला मुख्य पाइपलाइन न जोडल्याने ती योजना गेल्या वर्षभरापासून रखडली आहे. असे असताना ग्रामपंचायतीने ठेकेदाराला अर्धवट कामाचे तीन लाख पाच हजार रुपये दिले. लाखो रुपये खर्चुनही योजनेचा कोणताच लाभ न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चौकशीची मागणी
ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्यात मिलीभगत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ अविनाश डावरे यांनी केली आहे.

























































