Mumbai News – कूपर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

कूपर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून तीन डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

एका महिला रुग्णाला शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गंभीर अवस्थेत विले पार्ले येथील कूपर रुग्णालयातील आपत्कालीन विभागात आणण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ सीपीआर द्यायला सुरवात केली, मात्र रुग्णाला वाचवता आले नाही. रुग्णाच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत डॉक्टरांना मारहाण केली. कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर, निवासी डॉक्टर आणि एका इंटर्न डॉक्टरला नातेवाईकांनी मारहाण केली. यात तिघेही जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ने याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सुरक्षा उपाययोजनांच्या अभावाबद्दल संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.