
<<< नीलेश कुलकर्णी >>>
दिल्लीतील ‘शीशमहल’चे प्रकरण अंगाशी येऊन राजधानीतील सत्तेवर ‘उदक’ सोडावे लागले तरी ‘आप’चे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बंगल्याचा मोह कमी होताना दिसत नाही. ‘एक बंगला लगे प्यारा…’ हे गाणे गुणगुणत केजरीवाल सरकारी बंगल्याची पाठ सोडत नाहीयेत. एका शीशमहलने केजरीवालांच्या दिल्लीतील सत्तेच्या मनोरथावर पाणी फेरले तरीही केजरीवाल बंगल्याच्याच प्रेमात आकंठ बुडाले आहेत, यास काय म्हणावे?
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हाती सध्या केवळ पंजाबची सत्ता आहे. मात्र तिथेही चंदिगडमध्ये त्यांच्या सरकारने केजरीवालांच्या कॅम्प ऑफिससाठी दोन एकरांचा अलिशान सरकारी बंगला आवंटित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. वास्तविक, दिल्लीतील रेखा गुप्ता यांचे सरकार सगळ्याच पातळ्यांवर अल्पावधीतच अपयशी ठरलेले आहे. नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टींचे खापर पंडित नेहरूंवर पह्डतात तशा या रेखाबाई सगळ्या अपयशाचे खापर केजरीवालांच्या माथी फोडतात. दिल्लीत ना यमुना साफ झाली ना प्रदूषणाचे धुराडे स्वच्छ झाले. केजरीवालांच्या कार्यकाळापेक्षा दिल्लीची स्थिती अधिकच दयनीय झाली. मात्र रेखा गुप्तांच्या अपयशाला लक्ष्य करून दिल्लीत पुन्हा पक्षाचा जम बसवण्याऐवजी केजरीवाल ‘बंगला बंगला’ करण्यात मश्गूल आहेत.
मुळात केजरीवालांच्या पक्षाचा पाळणा हलला तो जंतरमंतरवरील अण्णा आंदोलनातून. ‘सिस्टीम’ बदलू पाहणारा नेता व पक्ष ही त्यांची नीजखूण. पायात स्लिपर, गळ्यात मफलर व ठेवणीतला खोकला ही त्यांची सुरुवातीची व्यक्तिवैशिष्ट्ये! मात्र सत्तेची ऊब मिळताच केजरीवालांचा खोकला पळाला, मफलर व स्लीपर गायब झाली. मुख्यमंत्री असताना सुरुवातीचा एक दिवस मेट्रोने मंत्रालयात जाणारे केजरीवाल नंतरच्या काळात आलिशान राजासारखे वागायला लागले. केजरीवाल या माणसात झालेला आमूलाग्र बदल दिल्लीकरांना फारसा पटला नाही. मात्र त्यांचे सरकार आरोग्य, शिक्षण, पाणी आणि विजेच्या क्षेत्रात चांगले काम करत असल्याने दिल्लीकरांनी केजरीवालांच्या या बदलाकडे कानाडोळा केला. मात्र ‘आप’च्या मंत्र्यांवर सातत्याने होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, केजरीवालांचे शीशमहल प्रकरण, त्यांना झालेली अटक यानंतर ते दिल्लीकरांच्या मनातून उतरले. दिल्लीकरांनी केजरीवालांना सत्तेबाहेर केले. त्यानंतर नाउमेद न होता ते पुन्हा सक्रियपणे मैदानात उतरतील असे वाटत होते. मात्र झाले वेगळेच. हल्ली केजरीवाल चंदिगडमध्ये जास्त असतात. दिल्लीतही फिरोजशाह रोडवरील एका खासदाराच्या बंगल्याला आलिशान रूप देऊन त्यांनी तिकडे अधूनमधून जाणे-येणे सुरू केले आहे. पक्षाचा प्रमुख म्हणून आपल्याला बंगला मिळावा म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंतची लढाई लढून केजरीवालांनी लोधी इस्टेटमध्ये एक बंगलाही मिळवला आहे. सत्तेतून बेदखल झाल्यापासून केजरीवालांची लढाई फक्त बंगल्यासाठी सुरू आहे हे दुर्दैवी आहे. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नडणारा नेता, अशी केजरीवालांची इमेज होती. मात्र ती आता संपली आहे. दिल्लीकरांना आपचे सरकार घालवल्याचा सध्या पश्चाताप होतोय खरा. मात्र दिल्लीकरांचा हा संताप व आक्रोश एन्कॅश करण्याइतपतही केजरीवाल प्रयत्न करत नाहीयेत.
भोजपुरी कलाकारांपासून ‘सुरक्षित अंतर’
बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप व राष्ट्रीय जनता दलाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी भोजपुरी सिनेमातील गायक, कलाकार मंडळींची मांदियाळी उतरवली असताना काँग्रेसही या कलाकारांच्या भानगडीत पडलेली नाही. त्याच वेळी नितीश कुमारांनीही भोजपुरी मंडळींपासून ‘सुरक्षित अंतर’ राखले आहे. भोजपुरी कलाकारांना लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनीही मानाचे पान वाढले आहे, तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांनीदेखील भोजपुरी कलाकारांना प्रचारासाठी आवतण धाडले आहे. दुसरीकडे नितीश कुमार यांनी मात्र भोजपुरी कलाकारांपेक्षा स्वतःच्या इमेजवर निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. नितीशबाबू हेच या निवडणुकीतले एकमेव स्टार कँपेनर आहेत. निवडणूकीपूर्वी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने बिहारी महिलांनी त्यांना ‘दस हजारी चचा’ हे नवे टोपणनाव दिले आहे. त्यामुळे जनतेत निःसंशय नितीश कुमार लोकप्रिय आहेत. त्यामुळेच ते थेट पंतप्रधानांनाही वाकुल्या दाखवत आहेत. निवडणुकीनंतर समसमान जागा लढविणारा भाजप सत्तेची संधी मिळाल्यास आपल्याला सहजासहजी मुख्यमंत्री होऊ देणार नाही, याची कल्पना असल्याने नितीश कुमार आतापासूनच आपले राजकीय महत्त्व दाखवीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभांना त्यांनी दांडी मारली. या सभेमध्ये मोदींना ‘नरेंद्र और नितीश मिलकर बिहार को आगे बढायेंगे’ असे बोलावे लागले. त्यामुळे विस्मृतीचा आजार झालेल्या नितीशबाबूंना हलक्यात घेणे आपल्याला महागात पडेल याचा अंदाज आता भाजपलाही येऊ लागलाय.
‘मोकामा’तील गर्दी
एखाद्या देवस्थानाला गर्दी व्हावी तशी गर्दी सध्या बिहारमधील मोकामामध्ये होते आहे. मोकामामध्ये विमानतळ असते तर आंतरराष्ट्रीय मीडियानेदेखील इथे तळ ठोकला असता. एकेकाळी राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारेंना ‘कव्हर’ करण्यासाठी जशी मीडियाची गर्दी उसळायची तशी मोकामामध्ये गर्दी होते आहे. अनंतसिंग हे कुख्यात महाशय सुशासनबाबू नितीश कुमारांच्या पक्षाचे उमेदवार. या अनंतसिंग ऊर्फ छोटे सरकारांनी दुलारचंद यादव नावाच्या प्रशांत किशोर यांच्या पक्षातील कार्यकर्त्याचा खून करून बिहारच्या निवडणुकीला रक्तरंजित गालबोट लावले. नितीशबाबू व भाजपवाले बिहारमध्ये रामराज्य असल्याचा दावा करत असतात. मात्र अनंतसिंग यांच्यासारखे खुनी गुंड त्यांच्याच पक्षाने पोसले आणि त्यांना अभय दिले आहे. मोकामाची निवडणूक कव्हर केली नाही तर स्वर्गांत जागा मिळणार नाही, ही बहुधा मीडियाची भावना असावी. अनंतसिंग तुरुंगाची हवा खायला गेले आहेत. मात्र त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री लल्लनसिंग प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अनंतसिंगांवर प्रश्न विचारल्यावर ते मीडियालाच डाफरत आहेत. ‘आपको सिर्फ अनंतसिंग दिखता है. ओसामा नही दिखता, सूरजभान नही दिखता,’ असा सवाल करत असा युक्तिवाद करताना दिसतात.




























































