
संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याला सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. त्यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोलीविरुद्ध निठारी हत्याकांड प्रकारात 13 खटले दाखल होते. त्यापैकी 12 प्रकरणांत त्याला आधीच निर्दोष ठरविण्यात आलेले आहे. कोली याच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. निठारी हत्याकांड 2006मध्ये उघडकीस आले होते. दिल्लीजवळ नोएडातील निठारी गावात एका नाल्यातून अनेक मानवी सांगाडे सापडले होते. या प्रकरणात एका कोठीचे मालक मोनिंदरसिंग पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांना अटक करण्यात आली होती. कोली याला 12 प्रकरणांमध्ये पुराव्यांअभावी निर्दोष ठरविण्यात आल्यामुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे त्याला न्यायालयाने निर्दोष ठरवून त्याच्या सुटकेचे आदेश दिले.























































