
पांगरी येथील बालविवाह प्रकरणासंबंधी राज्य महिला आयोग आणि जिल्हाधिकाऱयांनी एका पोलीस पाटील यांना कारवाईचे आदेश दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा दोन बालविवाह झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
तालुक्यातील देवठाण व पिंपळगावखांड येथे दोन अल्पवयीन मुलींचे विवाह झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अकोले पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
पिंपळगावखांड (कातरमाळ) येथे 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 15 वर्षे 8 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा आणि 17 वर्षे 10 महिने वयाच्या मुलाचा विवाह झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ग्रामविकास अधिकारी विनायक नारायण कर्डक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण किसन पारधी, यमुना लक्ष्मण पारधी (रा. पिंपळगावखांड) तसेच ईश्वर तुळशीराम जाधव, चांगुणा ईश्वर जाधव (रा. धावशी, जुन्नर, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना देवठाण (मेंगळवाडी) येथे 7 नोव्हेंबर 2025 रोजी घडली. देवठाण येथे 17 वर्षे 2 महिने वयाच्या मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका एस. सी. भनगडे यांनी दिली. याप्रकरणी लताबाई सुभाष मेंगाळ, सुभाष लक्ष्मण मेंगाळ, आकाश वसंत पथवे, वसंत लक्ष्मण पथवे आणि कविता वसंत पथवे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही घटनांचा तपास अकोले पोलीस करत आहेत.





























































