
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्यापासून प्रत्येक क्षेत्रात याचा वापर केला जातोय. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एआयचा वापर करतोय. पण एआयमुळे काहींना अडचणींचा सामाना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. आता AI च्या वाढत्या वापरावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी चिंता व्यक्त केली आहे. पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षांत जन्म घेणाऱ्या पिढीला या संकटांचा सामना करावा लागणार असल्याचे ते म्हणाले आहे.
एका इव्हेंटमध्ये बोलताना जावेद अख्तर म्हणाले, AIचा वाढता वापर सर्वांनाच चिंतेत टाकत आहे. विशेषतः चित्रपट उद्योगात, जिथे AIचा वापर चित्रपट तयार करण्यासाठी आणि आधीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये बदल करण्यासाठी केला जात आहे. तसेच तंत्रज्ञान सध्या क्रिएटिव्ह स्पेसला आकार देण्यास मदत करत असले तरी, त्याचा परिणाम पूर्णपणे सकारात्मक नसण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगतले. AI सध्या निश्चितच एक अतिशय सक्षम साधन आहे. पण ते फक्त वर्तमानाची गोष्ट आहे. ते एका सहाय्यकासारखे काम करते. त्यामध्ये क्रिएटिव्ह करण्यासारखे बरेच काही आहे. कोणतीही कला, मग ती चित्रकला असो, संगीत असो किंवा कविता असो, पूर्णपणे जागरूक मनाने तयार केलेली नसते. त्यातील बरेच काही मनाने तयार केले जाते आणि एआयमध्ये त्या संवेदनशील मनाचा अभाव आहे. त्यात बालपणी घालवलेले क्षण, तसेच कोणतीही मानसिक भावना व्यक्त होत नाहीत.
“कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल भीती वाटते. हे कधीच घडणार नाही असा विचार करून आपण स्वतःला फसवू नये. पुढच्या काही वर्षांत AIचे जग पूर्णपणे वेगळे असू शकते. मला वाटत नाही की, माझ्या आयुष्यात त्या पातळीवर पोहोचेल. परंतु कलाकारांच्या पुढच्या पिढीला निश्चितच एआयकडून एक वास्तविक आव्हान मिळेल. कारण ते अधिक मजबूत आणि सुसज्ज होईल”, असे जावेद अख्तर म्हणाले.




























































