मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीने मुदत संपल्यानंतरही मतदार यादीत नाव घुसवले, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट हिने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याच्या मुदतीनंतरही आपले नाव यादीत समाविष्ट केले, असा गंभीर आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यानंतर नोंदणी केलेल्या मतदारांची नावे निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. असे असतानाही हर्षदा शिरसाट यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी मतदार नोंदणीची अंतिम मुदत संपल्यानंतरही राजकीय दबाव आणून, सरकारी यंत्रणेचा वापर करून आणि नियमांचे उल्लंघन करून मतदार यादीत नाव घातले, असे सांगताना अंबादास दानवे यांनी तो अर्जही प्रसारमाध्यमांसमोर दाखवला.

आळंदीत भाजप कार्यकर्त्याची कमाल घरात राहतात 6 जण, पत्त्यावर मात्र 160 मतदार

नवीन मतदाराचे नाव मतदार यादीत टाकणे ही प्रक्रिया आहे, पण ते मतदार यादीत कधी घ्यायचे हे ठरलेले आहे. एका बीएलओने राजकीय दबावाखाली हर्षदा शिरसाट यांचे नाव मतदार यादीत घुसवल्याचा दावाही दानवे यांनी केला. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावरही त्यांनी ताशेरे ओढले. आळंदीतील एका भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये सहा मते आहेत, पण त्याच्या घराच्या पत्त्यावर 160 जणांची नोंद आहे, असे उदाहरणही त्यांनी दिले.