
उपनगरी रेल्वेने तिकीट प्रणालीत अधिकाधिक डिजिटल माध्यमांचा वापर केला. मात्र या डिजिटल माध्यमांचा प्रवासी गैरवापर करू लागले आहेत. कित्येकजण बनावट मोबाईल तिकिटाच्या एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करीत आहेत. ते यूटीएसच्या स्क्रीनशॉटमध्ये फेरफार करीत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या कारवाईत उघड झाले आहे.
जुलैपर्यंत पश्चिम रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांना एडिट केलेल्या यूटीएस तिकिटाच्या स्क्रीनशॉटचे पहिले प्रकरण आढळले होते. मात्र मागील दोन महिन्यांत कित्येक प्रवासी डिजिटल बनावट यूटीएसच्या नोंदीच्या मदतीने प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, अशा प्रवाशांचे एसी लोकल ट्रेनमध्ये अधिक प्रमाण आहे. तिकीट तपासनीसांकडे असलेल्या हॅण्डहेल्ड टर्मिनल्सवर बनावट मोबाईल तिकिटांचा पर्दाफाश होत आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने सर्व यूटीएस आधारित तिकिटांसाठी ऑन-ट्रेन पडताळणी तीव्र केली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


























































