
धक्का लागल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने हत्या करून फरार असलेल्या सहा आरोपींच्या मानपाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमर महाजन, अक्षयकुमार वागळे, अतुल कांबळे, नीलेश ठोसर, प्रतीकसिंग चौहान आणि लोकेश चौधरी अशी अटक केलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. मानपाडा पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना शिताफीने तपास करत ४८ तासांत नाशिक, मालेगाव आणि चाळीसगाव येथून त्यांना बेड्या ठोकल्या.
आकाश सिंग हा तरुण डोंबिवली पूर्वेतील मालवण किनारा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. रात्री उशिरा जेवण करून बाहेर निघताना त्याचा तरुणाला धक्का लागला होता. या किरकोळ कारणाचा राग मनात धरून हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोरांनी पोबारा केला होता. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक यंत्रणा व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत फरार असलेल्या सहा आरोपींना अटक केली.
प्रवाशावर कात्रीने हल्ला
ठाणे – सीटवर झोपू नको असे सांगणाऱ्या प्रवाशावर दोन माथेफिरूंनी कात्रीने हल्ला केल्याची घटना मंगला एक्स्प्रेसमध्ये घडली. भोला पाल असे प्रवाशाचे नाव असून तो उत्तर प्रदेशात मजूर म्हणून काम करतो. दरम्यान त्यांनी जनरल डब्यात बसायला जागा मिळावी म्हणून सीटवर झोपलेल्या एका प्रवाशाला उठवले. याचाच राग मनात धरून त्या प्रवासी व त्याच्या मित्राने भोलाला मारहाण करत पोटात कात्री भोसकली. जखमी भोलावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


























































