
>> दयानंद पाटील
वलसाड फास्ट पॅसेंजर डबल डेकर डबे असलेली कामगार वर्गाची अत्यंत पसंतीची गाडी होती. तसेच दुप्पट प्रवासी वाहून नेण्याची तिची क्षमतासुद्धा होती. मात्र या गाडीचे डबल डेकर डबे 5 जानेवारी 2025 पासून काढून साधे ICFचे सिंगल डेकर डबे लावून गाडी सुरू करण्यात आली. तथापि ही गाडी सुरू करताना रेल्वे प्रशासनाने अनेक गडबडी केल्यात. पुरेसे रेक उपलब्ध आहेत का, याचा विचार केला नाही. ज्या शटल, पॅसेंजर घिसाडघाईत सुरू केल्या गेल्या त्यांच्या रेकचाही वापर वलसाड फास्ट पॅसेंजरसाठी केला. त्यात गाडीच्या वेळांमध्येही उलटसुलट फेरफार केले. प्रवाशांना सोयीची 59045-46 वलसाड-वांद्रे पॅसेंजर गाडीऐवजी 09055-56 उधना-वांद्रे एक्स्प्रेस सुरू केली आहे. ती दोन दिवस बंद असते आणि तिचे तिकीट दर मेल/एक्स्प्रेसप्रमाणे आहेत.
या वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीच्या ICF डब्याबाबत, जे अतिशय जुन्या पद्धतीचे असल्याने प्रवाशांनी त्या वेळी नाराजी व्यक्त केली होती आणि आजही प्रवासी वर्ग नाइलाजाने प्रवास करत असून खूपच नाराज आहे.
एकीकडे 19011/12 वलसाड-दाहोद ही गाडी 25 जानेवारी 2025 पासून LHB डबे लावून सुरू केली गेली आहे तसेच अनेक स्पेशल गाडय़ासुद्धा LHB डब्यांच्या चालवल्या जात आहेत आणि अनेक अमृत भारत साधारण गाडय़ा सुरू करण्यात येत आहेत, परंतु 59023/24 वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीसाठी LHB डब्बे उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आजच्या आधुनिक युगात डबल डेकर डब्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे असे रेल्वेकडून सांगितले जात आहे. ही अगदीच हास्यास्पद बाब असून एकीकडे वातानुकूलित डबल डेकर डब्यांच्या गाडय़ा अनेक राज्यांत धावत आहेत. त्या गाडय़ांची संख्या जवळ जवळ दहा आहे. तसेच वंदे भारतसारख्या गाडय़ा स्लीपर कोच तयार होत आहेत. भारतीय रेल्वे आधुनिकतेची यशस्वी वाटचाल करत असताना वलसाड फास्ट पॅसेंजर गाडी शटल/पॅसेंजर गाडय़ांच्या डब्यांच्या उधारीवर एक प्रकारे चालवायला लागत आहे हे खेदजनक आणि निराशाजनक आहे.
‘‘रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की, 59023-24 वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीला सध्या जुन्या प्रकारच्या असलेल्या ICF डब्यांऐवजी LHB चे डबे लावण्यात यावेत किंवा पुशपुल टाईप अमृत साधारण गाडीचा रेक देण्यात यावा. पुशपुल अमृत साधारण गाडीला दोन्ही बाजूंना लोको इंजिन असल्याने इंजिन अदलाबदल करण्याची प्रक्रिया करावी लागणार नाही आणि त्यामुळे रेल्वेलाच लाभ होईल. तसेच प्रवाशांना सुखद प्रवासाचा लाभ घेता येईल.’’ – विनोद किणी, प्रवासी




























































