निमित्त- देह, अस्तित्व आणि माणूसपणाचा शोध

>> डॉ. जयदेवी पवार

जगभरातील साहित्यक्षेत्रात यंदाच्या बुकर पुरस्कारासाठी निवड झालेल्या डेव्हिड स्झाले या साहित्यिकाचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या ‘फ्लेश‘ या कादंबरीला यंदाचा बुकर सन्मान जाहीर झाला आहे. हा लेखक हंगेरीतला, पण ब्रिटिश साहित्यसंस्कृतीत विकसित झालेला आणि म्हणूनच त्याच्या लेखनात दोन संस्कृतींची छाया एकाच वेळी दिसते

गभरातील साहित्यक्षेत्रात यंदाच्या बुकर पुरस्कारासाठी निवड झालेल्या डेव्हिड स्झाले या साहित्यिकाचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या ‘फ्लेश‘ या कादंबरीला यंदाचा बुकर सन्मान जाहीर झाला आहे.  आधुनिक माणसाच्या मानसिक, सामाजिक आणि अस्तित्ववादी प्रवासाला नवीन भाष्य दिलं आहे. हा लेखक हंगेरीतला, पण ब्रिटिश साहित्यसंस्कृतीत विकसित झालेला आणि म्हणूनच त्याच्या लेखनात दोन संस्कृतींची छाया एकाच वेळी दिसते.

डेव्हिड स्झाले हे कॅनडात जन्मले. पण लेबनॉन, इंग्लंड, हंगेरी आणि आता व्हिएन्ना अशा विविध देशांत त्यांनी वास्तव्य केलं.  त्यामुळे ते पूर्णपणे युरोपीयही नाहीत आणि पूर्णपणे ब्रिटिशही. पण विविध ठिकाणच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब ही त्यांच्या लिखाणातील सर्वात महत्त्वाची बाजू ठरते. त्यांच्या पात्रांमध्ये सीमारेषा धूसर झालेल्या असतात. त्यांची लेखनशैली अत्यंत मितभाषी आहे. शब्द कमी, पण आशय प्रखर. फ्लेश ही कादंबरी या शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. या कादंबरीचा नायक इस्त्वान हंगेरीतील एका लहान शहरात वाढलेला आहे. तो अस्थिर पण प्रखर संवेदनशील तरुण असून वाचकांसमोर जणू तो रिकाम्या जागांमधून उभा राहतो. पुस्तकात त्याचं बाह्य वर्णन जवळजवळ नाही, पण त्याचं अस्तित्व प्रत्येक पानावर जिवंत आहे. त्याचं जगणं, त्याचे गोंधळ, त्याच्या इच्छा आणि त्याची अपराधीपणाची भावना या सगळ्यांतून लेखक आपल्याला एका माणसाच्या ‘देह‘या मूलभूत अनुभवापर्यंत पोहोचवतो.

‘फ्लेश’ या नावातच जीवनाचा विरोधाभास दडलेला आहे. देह म्हणजे अस्तित्वाचं भान आणि त्याच वेळी त्याचं बंधन. इस्त्वानच्या आयुष्यातील पहिला शारीरिक अनुभव हा नैतिक गोंधळाचा आरंभ ठरतो आणि त्यानंतर संपूर्ण जीवन त्या देहाच्या ओझ्याखाली झुकत जातं. बुकर परीक्षकांनी या कादंबरीबद्दल म्हटलंय की, ही अशी कादंबरी आहे जिथे रिकाम्या जागा वाचकाने भरायच्या आहेत. खरंच, स्झाले यांच्या गद्यलेखनात शब्दांइतकीच शांतताही बोलते. अनेक पानांवर कोणतेही संवाद नसतात, पण त्या शांततेतून व्यक्त होणारी वेदना, ईर्षा, अपूर्णता आणि रिक्तता हीच कथानकाची भाषा बनते. स्झाले यांनी 2008 साली ‘लंडन अॅण्ड द साऊथ-ईस्ट’ या कादंबरीने साहित्यविश्वात प्रवेश केला. त्यानंतर ‘ऑल दॅट मॅन इज’ आणि ‘टर्ब्युलन्स’ या कृतींनी त्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. ‘फ्लेश’ही त्यांची सहावी कादंबरी आहे, पण या पुस्तकाने त्यांच्या लेखनाचा उत्कर्षबिंदू गाठला आहे. त्यांचं लेखन आधुनिक युरोपीय समाजाच्या बदलत्या मूल्यांवर तीक्ष्ण प्रकाश टाकतं. जागतिकीकरण, स्थलांतर, वर्गभेद, आर्थिक यशाची भूक आणि भावनिक शून्यता  हे सारे घटक त्यांच्या कथांमध्ये एकत्र गुंफलेले असतात. फ्लेश मधील इस्त्वान हा माणूस सामाजिक स्तरावर वर जातो, पण आतून अधिकाधिक रिकामा होतो. त्याची प्रगती जणू आत्मविस्मरणाच्या दिशेने होते. तो बोलत नाही, वाद घालत नाही, आत्मकथन करत नाही. तो फक्त जगतो, आणि त्या जगण्यातूनच जीवनाची गुंतागुंत उलगडते. अभ्यासकांच्या मते, स्झाले यांच्या कथनशैलीतली ही मितकथनाची रचना आपल्याला आल्बर्ट काम्यू किंवा पॅट्रिक मॉडियानो यांच्या अस्तित्ववादी परंपरेची आठवण करून देते. ‘फ्लेश’ या कादंबरीत देह हा केंद्रस्थानी आहे; पण तो कामुकतेच्या पातळीवर नसून तर अस्तित्वाच्या पातळीवर आहे. इस्त्वान आपल्या शरीराशी, इच्छांशी आणि जगाशी असहज नातं जगतो. बालपणापासून त्याला मिळालेली भावनिक एकाकीपणाची सवय त्याच्या आयुष्यभर कायम राहते. एका विवाहित स्त्राrबरोबरच्या त्याच्या पहिल्या नात्यापासून सुरुवात होऊन त्याचं संपूर्ण आयुष्य ‘आकर्षण आणि रिक्तता’ यांच्यातल्या सततच्या झुल्यात अडकलेलं दिसतं. स्झाले या कथानकातून ‘आधुनिक पुरुषत्वाचं चित्र’ उभं करतात. हा पुरुष वर्चस्व गाजवणारा नाही; उलट आपल्या असुरक्षिततेमुळे, भावनिक निर्जीवतेमुळे आणि सामाजिक प्रगतीच्या वेगामुळे स्वतपासून दूर गेलेला आहे. बुकर परीक्षकांनी यावर भाष्य करताना म्हटलंय की, स्झाले यांचं पुरुषत्व म्हणजे निपियता आणि हीच निपियता त्यांच्या कथेला भेदक बनवते. हे पुरुषत्व सामर्थ्याचं नाही, तर रिक्ततेचं प्रतीक आहे.

आजच्या डिजिटल, वेगवान आणि तुटक समाजात जेव्हा माणूस स्वतपासूनच तुटत चालला आहे, तेव्हा ‘फ्लेश‘ सारखं लेखन आपल्याला आठवण करून देतं की आपण अजूनही शरीरात जगतो, श्वास घेतो, स्पर्श अनुभवतो आणि दुःख भोगतो. हा देहच आपल्या अस्तित्वाचां एकमेव पुरावा आहे आणि त्याचाच शोध घेणं म्हणजे स्झाले यांचं साहित्य.