
>> संध्या शहापुरे
कर्तव्य, मर्यादा, जबाबदारी समजून आचरण करणारा मर्यादा पुरुषोत्तम राम. सुखोपभोगाचा त्याग करून देहाला पडणाऱया कष्टात, सुख मानणारा राम. वियोगातही कर्तव्य परायण असलेला राम. राम म्हणजे स्वत आनंदात रममाण असलेला आणि दुसऱयांना आनंदात रममाण करणारा तो राम! रमते कणे कणे इति राम। आपली पंचेद्रिये, मन चित्त बुद्धी यात रामाचे ध्यान असणे, रामाचा वास असणे, म्हणजे रामाची भक्ती होय. रामावरची प्रीती होय. राम गावा राम घ्यावा। राम जीवीचा विसावा ।। रामाची सभ्यता आठवा, रामाचा विवेक आठवा, रामाचे गुणस्मरण हीच एक मोठी धनप्राप्ती आहे. अशा अलौकिक रूपातल्या रामाबद्दल प्रेम बाळगावे. सुखोपभोग टाळावा. देहाला पडणाऱया कष्टात सुख मानीत जावे आणि मनात नेहमी सारासार विवेक भरलेला असावा. रामाच्या आठवाने स्वार्थ बुद्धीला थाराच उरणार नाही. कुठले विकार, विचार तिथे शिरकाव करू शकणार नाहीत. ऐहिक सुखाचे ही विस्मरण होईल. सुखाची आसक्ती निर्माण झाली तर ती निर्धारपूर्वक टाळता येईल. कारण, तेव्हा आपल्या अंतरंगात राम असेल. उपभोगाच्या अधीन झालेल्या आपल्या मनाला त्यातले क्षणभंगुरत्व कळले पाहिजे. निखळ, निर्मळ, शाश्वत आनंद कशात आहे त्याचा शोध स्वतसाठी घेता आला पाहिजे. या श्लोकाचे हेच तर सार आहे!


























































