Bihar Election 2025 – सरकारी तिजोरीतून 10-10 हजार वाटणं किती योग्य? निवडणूक आयोगानं विचार करावा, शरद पवार स्पष्टच बोलले

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा शुक्रवारी निकाल असून एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. केंद्र सरकारने या निवडणुकीपूर्वी बिहारमधील महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये टाकण्यात आले होते. याचाच हा परिणाम असून अधिकृत पैसे वाटपामुळे बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते बारामतीत माध्यमांशी संवाद साधत होते.

बिहार निवडणूक निकालाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मी काही काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला फिडबॅक मिळाला. ही निवडणूक महिलांनी हाती घेतली होती. महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये टाकल्याचा हा परिणाम असावा.

महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीआधी लाडकी बहीणच्या माध्यमातून अधिकृत पैसे वाटले होते आणि बिहारमध्येही तसेच झाले. इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशाचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली तर निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करणे योग्य आहे का याचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, निवडणुका स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने व्हाव्याच याच्या बद्दल कुणाचे दुमत असायचे कारण नाही. पण 10-10 हजार ही काही लहान रक्कम नाही. विशेषत: याचा परिणाम काय होतो हे मी एकेकाळी बारामतीत बघितले. महापालिकेची निवडणूक आली की मतदानाच्या आदल्या दिवशी लोक वाट पाहायची. कशासाठी हे सांगायची गरज नाही.

वाटप झाले की निवडणुकीचे निकाल कसा यायचा ते दिसायचे. हे लहान प्रमाणावर होते, पण आता महिलांचे 50 टक्के मतदान असणाऱ्या राज्यात त्यांना 10-10 हजार रुपये देणे आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाणे याचा अर्थ निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ नव्हत्या याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. ही शंका निवडणूक आयोगाने लक्षात घ्यायला पाहिजे, असेही पवार म्हणाले.