दिल्ली डायरी – बिहार का मतलब नितीश कुमार!

>> नीलेश कुलकर्णी , [email protected]

बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पाशवी विजय मिळवला. या विजयामागे अनेक बाजू आहेत. कर्पुरी ठाकूर यांच्यानंतर बिहारी जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे नितीश कुमार हेच एकमेव नेते असल्याचा संदेश बिहार विधानसभा निवडणुकीने दिला आहे. राजकारण हे विलक्षण चंचल असते. बिहारमध्ये काय होते ते काही दिवसांत स्पष्टच होईल. पण एक खरे कीबिहार का मतलब नितीश कुमार हे समीकरण या निवडणुकीने पुन्हा उद्धृत केले आहे.

 नितीश कुमार यांच्या ‘राजकीय कोलांटउडय़ा’ प्रसिद्ध आहेत. मात्र तरीही नितीशबाबू हा भला माणूस आहे, त्याने लालूंच्या राज्यातील जंगलराजला पायबंद घातला. बिहार लौकिकार्थाने फारसे विकसित झाले नसले तरी बिहारी जनता नितीशबाबूंच्या राज्यात ‘निर्भय’ बनली. जीवनाची शाश्वती हा गोरगरीबांसाठी फार महत्त्वाचा विषय असतो. नितीशबाबूंच्या राज्यात भ्रष्टाचार असेल, पण कोणावर अन्याय नाही, या भावनेने अल्झायमरसारख्या भयंकर आजाराला सामोरे जात असलेल्या नितीश कुमारांना तारून नेले. ‘अपने नितेसबाबू को बीजेपीवाले फसां देंगे’ ही धारणा झाल्यामुळे जनतेने भरभरून नितीश कुमारांना मतदान केले. तसे ते छोटय़ा-मोठय़ा पक्षांची मोट बांधल्यामुळे भाजपलाही झाले. त्यामुळे दिल्लीची सत्ता टिकवायची असेल तर भाजपला नितीशबाबूंना ‘कट टू साईज’ करता येणार नाही.

बिहारच्या निवडणुकीपूर्वी नितीश कुमारांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी झाली होती. अल्झायमरचा विकार, भाजपने रचलेले जाळे, संजय झा, लल्लन सिंगसारखी भाजपला मिळालेली माणसे, या शारीरिक व मानवीय षड्यंत्राच्या चक्रव्यूहात अडकलेल्या नितीश कुमारांचे राजकारण या निवडणुकीत संपेल व आपण सत्तासिंहासनावर आरूढ होऊ, या भाजपच्या स्वप्नांना नितीश कुमारांनी पद्धतशीरपणे टाचणी लावली. मित्रपक्षाशी हस्तांदोलन करायचे, नंतर त्यांच्या अंगाखांद्यावर खेळून डोक्यावर बसायचे, हे भाजपचे मित्रपक्षाबाबत परंपरागत धोरण राहिले आहे. नितीश कुमारांचाही असाच गेम करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र नितीशबाबूंनी दिल्लीतील महाशक्तीपेक्षा राजकारणात चार पावसाळे जास्तच खाल्ले आहेत. भाजप चिराग पासवानला आपल्याविरोधात लढवून गेल्या वेळसारखी आपली दुर्दशा करेल, हे लक्षात आल्यानंतर नितीशबाबूंनी चाणाक्षपणे चिरागला आपलेसे केले. ‘हम दोनो एक दुसरे के खिलाफ लडेंगे तो नुकसान हमारा व फायदा बीजेपी का होगा, आज जो मेरे साथ हो रहा है व तुम्हारे साथ भी होगा!’ हे त्याला  समजावून सांगितले. गेल्या वेळी चिरागमुळे संयुक्त जनता दलाचे 25 पेक्षा अधिक उमेदवार पराभूत झाले होते. यावेळी नितीश कुमार अधिकच सावध झाले. उमेदवारांची अचूक निवड आणि राज्यभरात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे या जोरावर नितीशबाबूंनी उलटलेली बाजी पलटून लावली. नितीश कुमार युद्धात जिंकले असले तरी मुख्यमंत्रीपदाच्या तहात ते जिंकतात की हरतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सगळे काही विपरीत असताना त्यातूनही विजय कसा मिळवावा, याचे उदाहरण नितीशबाबूंनी सगळ्यांपुढे पेश केले आहे. नितीश हे मुख्यमंत्री बनतील, नाही बनतील, पण त्यांच्याच प्रतिमेमुळे हा विजय मिळालेला आहे. त्यांच्यामुळेच भाजपसाठी बिहारचे दरवाजे उघडले गेले आहेत हे नाकारून चालणार नाही.

दिल्ली स्फोटावर भाजपला चर्चाही नको

ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटामुळे देश हादरला. या स्फोटाच्या निमित्ताने देशभरातले ‘व्हाईट कॉलर टेरर मॉडय़ुल’ उघडकीस आले. या स्फोटाने गृहमंत्रालयाचे अपयश व इंटेलिजन्स फेल्युअर दोन्ही अधोरेखित केले. बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होण्याच्या पूर्वसंध्येला झालेला हा बॉम्बस्फोट व त्यानिमित्ताने दिल्ली, हरयाणा, पंजाब, जम्मू-कश्मीरमध्ये मिळालेला स्फोटकांचा साठा, हे सगळेच चक्रावणारे आहे. त्यापेक्षाही अधिक चक्रावणारी बाब म्हणजे या स्फोटासंदर्भात चर्चा करण्यास सत्तापक्षाने केलेला विरोध. त्याचे झाले असे की, या स्फोटानंतर दिल्लीत गृहमंत्रालयासंदर्भातील संसदीय समितीची बैठक होती. या स्फोटाचा विषय ताजा आणि संवेदनशील होता. त्यामुळे या बैठकीत दिल्ली स्फोटावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. मात्र अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेले भाजपचे राज्यसभा खासदार राधामोहन अग्रवाल यांनी अशी चर्चा करण्यास नकार दिला. संसदीय समितीच्या बैठकीचे विषय पूर्वनियोजित असतात. त्यामुळे ऐनवेळी स्फोटाच्या विषयावर चर्चा करता येणार नाही, असे अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या खासदारांचाही हिरमोड झाला. स्फोटासारख्या संवेदनशील विषयावर दोन-पाच मिनिटांची अधिकची चर्चा संसदीय समितीमध्ये करता आली असती. मात्र सरकारने ती टाळली. ती का? याबद्दल तर्कवितर्क देण्यात येत आहेत.

पीके बाबू

निवडणूक ‘व्यवस्थापन तज्ञ’ असणे, राजकीय विश्लेषक असणे वेगळे आणि राजकारणाच्या मैदानात उतरणे हे पूर्णतः वेगळे असते हे एव्हाना प्रशांत किशोर यांना चांगलेच उमगले असेल. पीके हे निष्णात निवडणूक तज्ञ आहेत. त्यांचा अभ्यास व अनुभव दांडगा आहे, याबद्दल दुमत असायचे कारण नाही. मात्र इतके दिवस पीके उंटावरून शेळ्या राखण्याचे काम करायचे. मात्र बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उडी मारली आणि आपली पाठ टेकवून घेतली. निवडणुकीत हारजीत चालत असते. मात्र पीके यांना ज्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे ते अधिक वेदनादायी आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढविल्या. सोशल मीडियावर चांगली हवा केली. मात्र त्यांनी स्वतः निवडणुकीच्या आखाडय़ातून माघार घेतली व त्यानंतर त्यांच्या पक्षाला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली. पीके हे प्रामाणिक गृहस्थ आहेत. ‘सिस्टिम’ बदलण्याची त्यांची भाषा व भूमिकाही प्रामाणिक होती. मात्र बिहारी जनतेच्या काही ती पचनी पडलेली दिसत नाही. निवडणुका जिंकण्याचे फंडे काही वेगळे असतात. त्यात आजकाल मतदारांना सरकारी मदतीने ‘उपकृत’ करण्याचे नवे फंडे चलनात आहेत. त्यामुळे पीकेबाबूंकडे बिहारी जनेतने दुर्लक्ष केले. सध्याच्या उपलब्ध पर्यायांमध्ये सर्वोत्तम पर्याय बिहारी जनतेसाठी नितीशबाबू हाच होता. त्यामुळे नितीश कुमारांच्या पदरात त्यांनी आपले माप टाकले. पीके यांच्याबद्दल जनतेमध्येही सहानुभूती होती. मात्र जनतेने त्यांना कौल दिला नाही. पदार्पणाच्या लढाईतील या दारुण अपयशानंतर पीकेबाबू पुढे काय करतात, हे पाहणे वेधक ठरणार आहे.