
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसीसाठी फक्त दोनच दिवस उरले आहेत. त्या कालावधीत केवायसी न केल्यास त्यांचा लाभ बंद होणार आहे. पण केवायसी केलेल्या पात्र लाभार्थींनाही केवायसीमधील एक प्रश्न अपात्र ठरवू शकतो. त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर नेमके काय द्यायचे असा महिला वर्गामध्ये संभ्रम आहे.
केवायसी करताना वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक दिल्यानंतर ‘तुमच्या घरात कुणीही सरकारी नोकरीत नाही’ या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही असे द्यावे लागते. परंतु नेमके कोणते उत्तर द्यायचे अशा संभ्रमात महिला वर्ग आहे. कारण या प्रश्नाचे होय असे उत्तर दिले तरी ते बरोबर आहे आणि नाही असे उत्तर दिले तरी त्याचा अर्थ घरात कुणीही सरकारी नोकरीत नाही असा होतो. याच गोंधळात लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात. या योजनेतून महिलांना सहजगत्या वगळता यावे म्हणून महिला व बालविकास विभागाने हा शाब्दिक गोंधळ जाणीवपूर्वक घातलाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. तसेच या प्रश्नाच्या उत्तराची खातरजमा करण्यासाठी सरकारने संबंधित महिलांच्या घरोघरी जाऊन तपासणी करायला हवी, अशीही मागणी होत आहे.
घटस्फोटित, एकल महिलांना मिळणार डच्चू
केवायसीच्या अटीमुळे घटस्फोटित व एकल महिलांनाही या योजनेतून डच्चू मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. केवायसी करताना वडील किंवा पतीचा आधार क्रमांक देणे बंधनकारक आहे. घटस्फोटित व एकल महिला पतीचा आधार क्रमांक देऊ शकत नाहीत. तसेच अशा अनेक महिलांचे वडील हयात नसल्याने त्यांच्यासमोरही यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्या आपोआपच या योजनेतून बाहेर फेकल्या जाणार आहेत.



























































