लवकरच यांना फेकून भाजप एकटाच सत्तेत दिसेल, मिंधेंच्या मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावरून वडेट्टीवारांची महायुतीवर टीका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार उडताच राज्यातील सत्ताधारी महायुतीत धमाके होऊ लागले आहेत. मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. या बैठकीला फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात मिधेंच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मिंधेंचे मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालना गेले आणि तिथे आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. या नाराजी नाट्यवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत निधी वाटपावरून किंवा कुठेही युती होत नसल्यामुळे नाराजीनाट्य सुरू असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

मुंबईतील मंत्रालयात आज राज्याची मंत्रिमंडळ बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मिंधेंच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. उदय सामंत, प्रताप सरनाईस, दादा भुसे, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारली. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मिंधे गटाचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले. आणि यावेळी तुम्ही जे करताय, ते योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीसांना म्हणाले. तसेच कल्याण-डोंबिवलीतल्या ऑपरेशन लोटसवरुन देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार देखील केली. तुम्ही उल्हासनगरमध्येही हेच करताय, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सत्तेमध्ये एकत्र राहून सत्तेचा मलिदा खाताना एकत्र खातात. आणि ज्यावेळेस सत्तेचा वाटा द्यायचा असतो त्यावेळेस यांच्यात आपसात मारामाऱ्या चालल्यात हे दिसून येतंय. आज जे काही नाराजीनाट्य आहे हे एकतर निधी वाटपावरून असेल, दुसरीकडे महाराष्ट्रात कुठेही यांची महायुती होताना दिसत नाही. लोकं पळवले जाताहेत. माणसं फोडली जाताहेत. आणि मित्र पक्षांना कमजोर करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे.

अनेक दिवसांपासून फायलींवर निर्णय होत नाही, अशी आमदारांची मंत्र्यांची ओरड आहे. त्यांना वेळेवर निधी मिळत नाही, निधी सोडला जात नाही. एकतर फायनान्स अडवते, एकतर सीएमओ ऑफिसमध्ये अडवले जातात, अशी कुजबूज त्यांच्यात प्रचंड आहे. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर एकमेकाची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे महायुतीचं भविष्य स्पष्ट आहे की, वापरा आणि फेका आता यांचा वापर झालेला आहे. लवकरच यांना फेकून देतील आणि भाजप एकटाच सत्तेत दिसेल, अशी टीका वडेट्टीवर यांनी केली आहे.