बिबट्या आता सांगली शहरातही! वानलेसवाडी परिसरात आढळले ठसे

सांगली शहरातील वानलेसवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोरून रविवारी मध्यरात्री बिबटय़ा फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी ही बाब वन विभाग आणि स्थानिक पोलिसांना कळवली. त्यांनी तत्काळ धाव घेत शोधमोहीम सुरू केली. कुंभारमळा परिसरासह अन्य काही भागात त्याच्या पायाचे ठसे आढळल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, परिसरात घबराट पसरली असून, नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

भारती हॉस्पिटलच्या समोरील भागात मध्यरात्री एक दाम्पत्य दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी त्यांना बिबटय़ा असल्याचे दिसून आले. त्यांनी गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी बिबटय़ा झुडपात पळून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर वानलेसवाडीतील एका बंद इमारतीच्या परिसरातही त्याला काही नागरिकांनी पाहिले होते. त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आले. पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, सोमवारी सकाळी आणि सायंकाळीही वन विभागाच्या पथकाने शोधमोहीम राबवली. त्यानंतर कुंभारमळा परिसरातील शेतात त्याच्या पायाचे ठसे मिळून आले होते. तसेच, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पूर्व भागातील जंगलात जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. आजही तो मिळून आला नाही. बिबटय़ाच्या वावराची बातमी वाऱयासारखी परिसरात पसरली. त्यामुळे धबराटीचे वातावरण होते. नागरिकांनी खबरदारी बाळगावी, बिबटय़ा दिसल्यास संपर्क करावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

उसातील बिबट्या

गेल्या काही वर्षांपासून माणूस आणि बिबटय़ा असा संघर्ष सुरू आहे. ऊसतोडी सुरू झाल्यानंतर बिबटय़ा मानवीवस्तीत दिसून येत असल्याचे निरीक्षणातून समोर आले आहे. ऊसतोडीनंतर बिबटय़ा सैरभैर होतात. अन्नाच्या शोधासाठी ते मानवीवस्तीत शिरत असल्याचा निष्कर्ष लावला जात आहे.