
‘मेरी झाँशी नही दूंगी’ म्हणत झाशीची राणी शेवटपर्यंत लढली. त्याचप्रमाणे ‘ही माझी मुंबई आहे, माझी मुंबई लुटायला देणार नाही, अशा निर्धाराने आपण प्रत्येकाने उभे राहिले पाहिजे. आता चर्चाचर्वण करत बसायचे नाही, आता जिंकायचे आहे आणि जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार,’ असा वज्रनिर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.
आता हे लोक एबी फॉर्मही चोरू लागलेत. मग चोरबाजारात जाऊन बसा. सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ते म्हणून मिरवायचं. ही खोटी लोकशाही आहे. ती जनता स्वीकारणार नाही.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरच्या सभागृहात ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिन आयोजित केला होता. यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना संघटनावाढीसाठी कार्य केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या योगदानाबद्दल उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेना आणि शिवसैनिक कधी म्हातारा होत नाही. ही आपल्याला शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. माणूस वयाने थकत नसतो. तो ज्यावेळी मनाने थकतो, त्यावेळी वृद्ध होतो. तुम्ही मनाने थकलेला नाहीत, त्यामुळेच आजही जुन्या त्याच जोशाने शिवसेनेसोबत आहात. तुम्ही त्यावेळी शिवसेनेसोबत असायचा म्हणून आम्ही कुटुंबीय निर्धास्त असायचो. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नव्हती, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
वर्धापन दिन सोहळ्यात परेश दाभोळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘स्वर संध्या’ हा कार्यक्रम सादर केला. सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, दिवाकर रावते, आमदार महेश सावंत, मिलिंद नार्वेकर, ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे प्रमुख चंद्रकांत खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेबांच्या अंगरक्षकांसह इतर ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान
ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक असलेल्या दिना सावंत, वासुदेव चव्हाण, शाम नायडू यांच्यासह उदय परब, आप्पा चव्हाण, प्रवीण देव्हारे, दत्ता देवेकर, प्रमोद इनामदार, कृष्णकांत कोंडलेकर, प्रकाश कारखानीस, बाबू शेख, शपुंतला घाटगे, सुबोध महाले, कुंदन आगासकर, रमेश शेटये, नारायण शिगवण, तावजी गोरुले, बाबा परुळेकर, रामदास पारकर, ज्ञानेश्वर गावडे, मच्छिंद्र कचरे या निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानित करण्यात आले. त्यांना शाल आणि पुष्पगुच्छासह मुंबई महापालिकेची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचे प्रमुख चंद्रकांत खोपडे यांच्यासह शिवसेना भवन येथील ज्येष्ठ शिवसैनिकांचे पदाधिकारी व इतर ज्येष्ठ शिवसैनिकांनी वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
… हा हिंदुत्वाचा अपमान नाही का?
पालघरच्या साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपने पक्षप्रवेश दिला हा हिंदुत्वाचा अपमान नाही का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी फडणवीस सरकारला केला. मी मुख्यमंत्री असताना साधू हत्याकांडावरून बोंबाबोंब केली. मी हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे बेंबीच्या देठापासून बोंबलत होते. त्याच हत्याकांडातील आरोपीला त्याला गोमूत्र शिंपडून पवित्र केले का, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिल्या पाचामध्ये होते. त्यांच्या घरात माझा जन्म झाला. हा वारसा असताना मुंबईचे लचके तोडले जात असतील तर बघत बसायचे का?
आत्मनिर्भर भारत सोडाच, आत्मनिर्भर भाजप करू शकले नाहीत!
‘भाजपने 2014 साली आत्मनिर्भर भारत’ ही घोषणा दिली होती, पण हे आत्मनिर्भर भाजप करू शकले नाहीत. सगळे टोणगे, कोणी हत्याकांडातले, कुणी भ्रष्ट, ड्रग्जवाले घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागत आहे. भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजप वाढवावा, हे त्यांचे धोरण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
ज्येष्ठ शिवसैनिकांना ओळखपत्र देणार!
‘शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झाला आहे. शिवसेनेत आता जे राहिले आहेत, ते शिवसेनाप्रमुखांचे अस्सल तलवारबाज मावळे राहिले आहेत, असे सांगून, ’या सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिकांचे माहिती संकलन करा. मुंबईतील शाखा-शाखांमध्ये जेवढे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, त्यांना ओळखपत्र दिले जाईल. एक दिवस या सगळ्यांचे शिबीर घेऊन मी त्यांच्याशी संवाद साधेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.




























































