एनडीएने बिहारची मते 5.5 रुपये प्रतिदिन दराने विकत घेतली! प्रशांत किशोर यांचा दावा

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला पाशवी बहुमत मिळाले, तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. यावर आता प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली असून एनडीएने बिहारची मते 5.5 रुपये प्रतिदिन दराने विकत घेतल्याचा दावा केला. ते चंपारणमधील भितिहरवा येथे माध्यमांशी बोलत होते.

बिहार निवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी एक दिवसांचे मौन करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार ते गुरुवारी चंपारणमधील भितिहरवा येथील गांधी आश्रमात गेले. यानंतर शुक्रवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.

जनतेची मतं खरेदी करण्यात आली. निवडणुकीवेळी महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा करण्यात आले आणि जीविका दिदींनाही त्यांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले. नितीश कुमार प्रामाणिक असले तरी त्यांच्या नावावर भ्रष्टाचाराचा खेळ सुरू आहे. जागतिक बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा पैसा वळवून मतांसाठी वापरण्यात आला. गरिबांची स्वप्न हिरावून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले.

मागील सहा ते सात दिवस कठीण गेले. याचे कारण जनसुराज पक्षाचा पराभव नाही, तर बिहारच्या जनतेची मतं साडे पाच रुपये प्रतिदिन दराने खरेदी करण्यात आली. हा लोकशाहीवरील अन्याय आहे. बिहारमधील व्यवस्था बदलू शकते अशी आशा होती. पण लोकशाहीचा पाया असणारी मते खरेदी करण्यात आली. 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले, असेही ते म्हणाले.

गरिबांना 2 लाखांचे अमिष दाखवण्यात आले आणि 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. आता पुढील एक-दीड वर्षात घरोघर पोहोचवून प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी जनसुराज पक्ष घेत आहे. आधी कोणत्याही अटी घातल्या नाही, कारण तेव्हा मतं हवी होती. आता निवडणूक झाली असून सरकारी अधिकारी अटी-शर्तीत अडकवतील. पण दीड कोटी महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी 15 जानेवारीपासून ‘बिहार नवनिर्माण संकल्प’ हाती घेतला जाईल आणि प्रत्येक वॉर्डात पोहोचू, असेही ते म्हणाले. सरकारने पैसे दिले नाही तर सर्व नागरिकांसह सरकारी कार्यालयांना घेराव घालू, असा इशाराही त्यांनी दिला.