राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी 253 कोटींचा निधी

राज्यातील विविध विमानतळांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत असून आता शिर्डी, छत्रपती संभाजीनगर व इतर विमानतळांसाठी राज्याच्या वित्त विभागाने 253 कोटी 42 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 423 कोटी 4 लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने वित्त विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार वित्त विभागाने 253 कोटी 42 लाख 40 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार विमानतळ कंपनीला हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शिर्डी विमानतळावरील विस्तारित व नवीन एकात्मक टर्मिनल इमारत उभारणीची कामे व विस्तारीकरणाची उर्वरित कामे, सिटीसाईड इमारतीचे व एटीसी टॉवरच्या उभारणीच्या कामासाठी 136 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच राज्यातील विमानतळांसाठी लागणाऱया सोयीसुविधा उभारण्यासाठी निधी म्हणून 30 कोटी रुपये आणि संभाजीनगर विमानतळाच्या 130 एकर जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी 87 कोटी 24 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

दरम्यान पुणे येथील सध्याच्या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यासाठीचा प्रस्ताव आणि संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.