ज्या भाजपसोबत आमची युती होती तो आता शिल्लकच राहिला नाही; उद्धव ठाकरे यांचे फटकारे

भाजपमध्ये वाट्टेल ते चालले आहे. त्यांना फक्त जिंकायचे आहे, असे सांगतानाच ज्या भाजपसोबत आमची युती होती तो भाजपच आता शिल्लक राहिलेला नाही, असे फटकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावले. गेली 52 वर्षे जनसंघापासून झटून काम करणारे भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. या प्रवेशामुळे मांडा-टिटवाळ्यात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

मांडा-टिटवाळा पॅनल क्रमांक 3 मधील माजी नगरसेवक सुरेश भोईर गेल्या 52 वर्षांपासून भाजपमध्ये होते. 1973 मध्ये जनसंघातून त्यांनी राजकीय प्रवासास सुरुवात केली. 2000 ते 2005 या कार्यकाळात नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले, परंतु स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत राजकारण आणि अन्य पक्षातील पदाधिकाऱयांना निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश देऊन भाजप पदाधिकाऱयांवर अन्याय सुरू असल्यामुळे सुरेश भोईर यांनी भाजपच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत भाजप ठाणे जिल्हा सचिव प्रदीप भोईर, ज्येष्ठ पदाधिकारी हनुमान भोईर, व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रतीक भोईर, अक्षय भोय यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे काय चालले आहे हे तुम्ही जनसंघापासूनचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर तुम्हाला सर्व माहीतच आहे. शिवसेना त्यावेळी त्यांच्यासोबत का गेली तर भूमिपुत्र, हिंदुत्व हे सगळं निगडित होतं. आता या शब्दांशी भाजपला काहीही देणेघेणे राहिलेले नाही. अशा परिस्थितीत तुम्ही जे पाऊल उचलले आहे, त्यामुळे मी तुमचे अभिनंदन करतो. आपले हिंदुत्व वेगळे आहे ते राष्ट्रीयत्वाशी जोडले आहे. तेच आपल्या सगळय़ांना पुढे घेऊन जायचे आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उपनेते विजय साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, विधानसभा संघटक किशोर शुक्ला आदी उपस्थित होते.

हवा झाली बेइमान जरी, तरी मशाल विझत नसते; शिवसेनेवरील कविता तुफान व्हायरल

एका हिंदूचे आयुष्य उद्ध्वस्त आणि हिंदुत्वाशी प्रतारणा

दोन दिवसांपूर्वी भाजपने पालघरमधील गडचिंचले येथील काशीनाथ चौधरीला प्रवेश दिला. मी मुख्यमंत्री असताना साधू हत्याकांडावरून भाजपने किती काहूर माजवले. अर्थात ती घटना दुर्दैवीच होती. या भाजपवाल्यांनीच काशीनाथ चौधरीला बदनाम केले आणि आता त्यांच्या पक्षात प्रवेश दिला. माझे भाजपवाल्यांना दोन प्रश्न आहेत. त्याचा साधू हत्याकांडात सहभाग होता तर त्याला तुमच्या पक्षात प्रवेश का दिला आणि जर नव्हता तर प्रवेशाला स्थगिती का दिली. भाजपवाल्यांची पंचायत अशी झाली की, तेव्हा ते बोंबलून मोकळे झाले होते. त्यामुळे भाजपने त्याची आणि हिंदूंची माफी मागितली पाहिजे.