
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मिहीर शहा याला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. गुह्याचे गंभीर स्वरूप, घटनेनंतर ओळख लपवण्यासाठी आरोपी शहाचे वर्तन तसेच पुराव्यांशी आरोपीकडून छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती नीला गोखले यांनी आरोपी मिहीर शहाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
वरळी येथे 7 जुलै 2024 रोजी एका बीएमडब्ल्यू कारने नाखवा दाम्पत्याला जोरदार धडक दिली या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेतल्याप्रकरणी मिंधे गटाचा पदाधिकारी राजेश शहा याचा मुलगा मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी मिहीर शहा याने हायकोर्टात अर्ज दाखल केला होता.या अर्जावर न्यायमूर्ती निला गोखले यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने मनकुवर देशमुख यांनी युक्तिवाद करताना आरोपी मिहीर शहाच्या अर्जाला जोरदार विरोध केला तर अपघातात मृत्यू झालेल्या कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी सुद्धा मध्यस्थी याचिका दाखल करत आरोपीच्या जामीन अर्जाला जोरदार आक्षेप घेतला. न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असला तरी, खटला सुरू होणे बाकी आहे व या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेले स्कूटर चालक प्रदीप नाखवा यांची न्यायालयात साक्ष होणे अद्याप बाकी आहे. आरोपी साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मिहीर शहाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.





























































